वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

Akash Deep News: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आकाश दीप याने केलेली भेदक गोलंदाजी भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली होती. या संपूर्ण सामन्यात आकाश दीप याने मिळून दहा बळी टिपत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये आपलं नाणं खणखणीतपणे वाजवणाऱ्या आकाश दीप आणि त्याच्या कुटुंबीयांनी केलेल्या संघर्षाची करुण कहाणी चर्चेत आली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आकाश दीप याने केलेली भेदक गोलंदाजी भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली होती. या संपूर्ण सामन्यात आकाश दीप याने मिळून दहा बळी टिपत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये आपलं नाणं खणखणीतपणे वाजवणाऱ्या आकाश दीप आणि त्याच्या कुटुंबीयांनी केलेल्या संघर्षाची करुण कहाणी चर्चेत आली आहे.

आकाश दीपचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंतचा प्रवास आहे विविध प्रकारच्या संघर्षांनी भरलेला आहे. आकाश दीप हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील हुतात्मा बाबू निशान सिंह यांचा वंशज आहे. बाबू निशान सिंह यांना इंग्रजांनी कैमूर येथील गुहेमधून पकडन सासाराम येथे तोफेच्या तोंडी दिले होते.

आकाश दीप याची कौटुंबिक पार्श्वभूमी सर्वसामान्य असून, त्याचे वडील रामजी सिंह हे सासाराममध्ये शिक्षक होते. मुलाने सरकारी नोकरी करावी, असे त्यांना वाटत असे. मात्र त्याची आई लाडूमा देवी यांना मुलाची क्रिकेटबाबत असलेली आवड ठावूक होती. त्यामुळे तिने त्याला क्रिकेटच्या ट्रेनिंगसाठी पाठवलं.

दरम्यान, २०१५ मध्ये आकाशदीपच्या वडिलांचं अर्धांगवायूमुळे अकाली निधन झालं. एवढंच नाही तक दोन महिन्यांनी त्याचा भाऊ धीरज सिंह याचाही मलेरियामुळे मृत्यू झाला. कुटुंबावर झालेल्या या दु:खाच्या आघातांमुळे घराची संपूर्ण जबाबदारी आकाशदीप याच्यावर आली. तेव्हा कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. मात्र आकाश दीप या कठीण प्रसंगामध्येही खचला नाही.

पुढे आकाश दीप याने सासाराम ते दुर्गापूर आणि तिथून पुढे कोलकातापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. तिथे आकाश दीप याला बंगालच्या २३ वर्षांखालील संघामध्ये संधी मिळाली. तसेचे २०१७-१८ च्या हंगामात ४२ बळी घेत त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. रणजी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. २०२२ मध्ये त्याला आरसीबीने आयपीएलमध्ये संधी दिली. तिथून पुढे त्याच्यासाठी भारत अ आणि भारताच्या मुख्य संघातील प्रवेशासाठीचे दरवाजे उघडले.

दरम्यान, आकाश दीप याने एजबेस्टन कसोटीमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर सांगितलं की, माझी मोठी बहीण ज्योती सिंह ही कर्करोगाशी झुंजत आहे. हल्लीच तिला कर्करोगाचं निदान झालं आगे. आजची कामगिरी मी तिला समर्पित करतो.

एकूणच आकाशदीपची कहाणी ही केवळ क्रिकेटच्या मैदानापुरती मर्यादित नाही आहे. तर ही अशा एका तरुणाची कहाणी आहे ज्याने जीवनातील आव्हानांसमोर कधीही हार मानलेली नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक चणचण, वैयक्तिक दु:खं सारंकाही असतानाही त्याने आपल्या मनात बाळगलेल्या स्वप्नांचा भंग होऊ दिला नाही. हाच संघर्ष त्याला आता भारतीय संघापर्यंत घेऊन आला आहे.