नुकत्याच आटोपलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत भारतीय संघाने २-१ अशा फरकाने विजय मिळवला आहे. आता १७ मार्चपासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कमाल करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. यावर्षी होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे.
कसोटी मालिकेतील विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. मात्र १७ तारखेला पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा खेळणार नाही. त्याच्या जागी हार्दिक पांड्या संघाचं नेतृत्व करताना दिसेल.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रविचंद्रन अश्विनला संघात स्थान मिळालेलं नाही. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक २५ विकेट्स मिळवले होते. त्यात त्याची सरासरी ही १७ अशी राहिली होती. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांना संयुक्तपणे मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.
अश्विनने त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना गतवर्षी जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळला होता. त्याने आतापर्यंच ११३ एकदिवसीय सामन्यामध्ये ३३ च्या सरासरीने १५१ विकेट्स मिळवले आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचा विचार केल्यास फिरकी गोलंदाज म्हणून रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांना संघात स्थान मिळालं आहे. कुलदीप यादवच कसोटी संघात समावेश होता. मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
रवींद्र जडेजा दुखापतीमुळे जवळपास ६ महिने संघाबाहेर होता. त्याने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतून संघात पुनरागमन केले. या मालिकेत त्याने २२ विकेट्स टिपले. तसेच फलंदाजीमध्येही कमाल दाखवताना १३५ धावा काढल्या.
अक्षर पटेलला या मालिकेत केवळ ३ विकेट्स टिपता आले. मात्र त्याने ५ डावात फलंदाजी करताना ८८ च्या सरासरीने २६४ धावा काढल्या. त्यात त्याच्या ३ अर्धशतकांचाही समावेश होता. भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा यावर्षी भारतात होणार आहे. अशा परिस्थितीत फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सर्वजण आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतील. चहलपासून कुलदीप यादवपर्यंत सर्वजण आपलं सर्वोत्तम योगदान देण्यासाठी उतरतील.