इंग्लंडच्या टॅमी बियूमोंटने ८८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; मिताली राजच्या 'विशेष' पंक्तित स्थान!

महिलांच्या ॲशेस मालिकेतील पहिली कसोटी रंजक वळणावर आली आहे. यजमान इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या दिवशी ८६ षटकांत १२७ धावा करायच्या आहेत, तर ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सची गरज आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७३ धावांचा डोंगर उभा केला. एलिसे पेरी ( ९९), ॲनाबेल सदरलँड ( १३७), ताहलिया मॅग्राथ ( ६१) आणि ॲश्लेघ गार्डनर ( ४०) यांनी ऑस्ट्रेलियाकडून दमदार फलंदाजी केली. इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टनने १२९ धावांत ५ विकेट्स घेतल्या.

इंग्लंडकडूनही जबरदस्त पलटवार झाला अन् त्यांनी ४६३ धावांपर्यंत मजल मारून ऑसींना १० धावांचीच आघाडी घेऊ दिली. कर्णधार हिदर नाईट ( ५७), नॅथ श्विव्हर ब्रंट ( ७८) आणि डॅनी वॅट ( ४४) यांनी चांगला खेळ केला. पण, टॅमी बियूमोंट पराक्रम गाजवला.

ॲशेस मालिकेत द्विशतक करणारी ती इंग्लंडची पहिली महिला खेळाडू ठरली. एकंदर इंग्लंड महिला कसोटी इतिहासात २०० धावा प्रथमच एका खेळाडूकडून झाल्या. तिने १९३५ साली इंग्लंडच्या बेट्टी स्नोवबॉलचा सर्वाधिक १८९ ( वि. न्यूझीलंड) धावांचा विक्रम मोडला.

टॅमीने ३३१ चेंडूंत २७ चौकारांच्या मदतीने २०८ धावा केल्या आणि इंग्लंडकडून हा एखाद्या खेळाडूने केलेल्या सर्वोत्तम वैयक्तिक धावा ठरल्या.

महिला कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी ती आठवी खेळाडू ठरली. यापूर्वी, क्रिस्टी बाँड, जॉन ब्रोडबेंट, मिचेले गोस्झ्को, कॅरेन रोल्टन, मिताली राज, किरन बलूच, एलिसे पेरी यांनी ही कामगिरी केली आहे.

इंग्लंडने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला २५७ धावांवर गुंडाळलं. सोफीने ६३ धावांत ५ विकेट्स घेतल्या. एकाच कसोटीत १० विकेट्स घेणारी ती जगातील दहावी गोलंदाज ठरली.