T20 World Cup,Semifinal Scenario of Group 2 : पाकिस्तान संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी दक्षिण आफ्रिकेवर ३३ धावांनी विजय मिळवताना ग्रुप २ चे समीकरण रंगतदार केले. आज आफ्रिका जिंकला असता तर उपांत्य फेरीत प्रवेश करणारा तो पहिला संघ ठरला असता, पंरतु आजच्या विजयाने पाकिस्तानच्याही उपांत्य फेरीच्या आशा जीवंत राहिल्या आहेत.
पाकिस्तानने आज प्रथम फलंदाजी करून ९ बाद १८४ धावा केल्या. ४३ धावांत ४ विकेट्स गेल्यानंतर इफ्तिखार अहमद (५१) व शादाब खान ( ५२) यांनी वादळी खेळी करू मोठी धावसंख्या उभारून दिली. एनरिच नॉर्खियाने ४ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात आफ्रिकेची अवस्था ९ षटकांत ४ बाद ६९ अशी झाली असताना पावसाने एन्ट्री घेतली आणि त्यावेळी डकवर्थ लुईस नियमानुसार आफ्रिका १६ धावांनी पिछाडीवर होता. पाऊस थांबल्यानंतर आफ्रिकेसमोर १४ षटकांत १४२ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले आणि त्यानुसार त्यांना ३० चेंडूंत ७३ धावा करायच्या होत्या.
हेनरिच क्लासेन व त्रिस्तान स्तब्स यांनी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. पण, पाकिस्तानी गोलंदाजांनी संधी साधली आणि आफ्रिकेला ९ बाद १०८ धावाच करू दिल्या. शाहिन शाह आफ्रिदीने १४ धावांत ३, शादाब खानने १६ धावांत २ विकेट्स घेतल्या.
या विजयानंतर पाकिस्तानचे ४ गुण झाले आहेत, परंतु त्यांचा नेट रन रेट हा भारतापेक्षाही चांगला झाला आहे आणि हा धोक्याचा इशारा आहे. पाकिस्तानचा नेट रन रेट +१.११७ इतका झाला आहे आणि बांगलादेश ४ गुण व -१.२७६ नेट रन रेटसह चौथ्या क्रमांकावर सरकला आहे. भारत ६ गुणांसह अव्वल स्थानी असला तरी नेट रन रेट हा ०.७३० इतका आहे.
भारताला अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेशी मुकाबला करायचा आहे आणि हा सामना मेलबर्नवर होणार आहे. मेलबर्नवरील आतापर्यंत तीन सामने पावसामुळे रद्द करावे लागले आहेत आणि भारत-झिम्बाब्वे लढतीत पावसाची शक्यता आहे. अशात हा सामना रद्द झाला तर आणि झिम्बाब्वेने पाकिस्तानसारखा करिष्मा भारताविरुद्ध केल्यास काय होईल?
ग्रुप २ मध्ये दक्षिण आफ्रिका वि. नेदरलँड्स, भारत वि. झिम्बाब्वे व पाकिस्तान वि. बांगलादेश अशा लढती आहेत. आफ्रिकेने विजय मिळवल्यास त्यांचे ७ गुण होतील, पाकिस्तान जिंकल्यास त्यांचे ६ गुण होती आणि भारत जिंकल्यास ८ गुणांसह अव्वल स्थानी जाईल. पण, भारत हरल्यास त्यांना ६ गुणांवर समाधानी रहावे लागेल आणि अशात पाकिस्तान सरस नेट रन रेटच्या जोरावर सेमीत जाईल.
न्यूझीलंडला अखेरच्या सामन्यात आयर्लंडशी, ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानशी आणि इंग्लंडला श्रीलंकेशी भिडावे लागणार आहे. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि भारत यांनी त्यांच्या उर्वरित लढती जिंकल्यास हे तीनही संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. अशात उपांत्य फेरीत भारताचा मुकावला इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाशी आणि आफ्रिकेचा मुकालबा न्यूझीलंडशी होईल.