T20 World Cup, Semi Finals qualification : झिम्बाब्वे क्रिकेट संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात गुरुवारी स्वतःचे नाव सुवर्णाक्षराने लिहिले. पाकिस्तानसारखा कट्टर स्पर्धक समोर असतानाही तुलनेने दुबळा असलेल्या झिम्बाब्वेने न खचता खेळ केला आणि १ धावेने सामना जिंकला. झिम्बाब्वेचा हा विजय पाकिस्तानसाठी भयाण स्वप्न ठरला असला तरी तो भारत व दक्षिण आफ्रिका यांचेही टेंशन वाढवणारा ठरला आहे.
१३० धावांचे माफक लक्ष्य पाकिस्तान सहज पार करेल असाच अंदाज अनेकांनी बांधला होता, परंतु झिम्बाब्वेने उत्तम सांघिक कामगिरी करून सर्वांना गपगार केले. पाकिस्तानात जन्मलेल्या सिकंदर रजाने उल्लेखनीय गोलंदाजी करताना सामना फिरवला. त्यात क्षेत्ररक्षणात झिम्बाब्वेने १५-२० धावा रोखल्या आणि त्याच महत्त्वाच्या ठरल्या. पाकिस्तान कसाबसा १२९ धावांपर्यंत पोहोचू शकला.
पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव ठरला आणि त्यांचे उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग अधिक खडतर बनला आहे. मागच्या वर्ल्ड कपमध्ये ज्या परिस्थिती भारतीय संघ होता आज त्याच जागेवर पाकिस्तान उभा आहे. पाकिस्तानचे अजून तीन सामने ( बांगलादेश, नेदरलँड्स व दक्षिण आफ्रिका) शिल्लक आहेत आणि त्यांना आव्हान टीकवण्यासाठी ते तीनही सामने जिंकावे लागतील.
तीन विजयासोबतच पाकिस्तानला दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वे यांच्या पराभवासाठी प्रार्थनाही करावी लागणार आहे. सध्या गुणतालिकेत हे दोन्ही संघ प्रत्येकी ३ गुणांसह दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यात भारताने उर्वरित सर्व सामने जिंकल्यास पाकिस्तानचा फायदाच होणार आहे. अशा परिस्थितीत नेट रन रेट अत्यंत महत्त्वाचा ठरेल आणि कर्णधार बाबर आजम याने आता त्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्धार काल व्यक्त केला.
त्याचवेळी झिम्बाब्वेचेही उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यांना उर्वरित सामन्यांत बांगलादेश, नेदरलँड्स व भारताचा सामना करायचा आहे. यापैकी दोन सामने जिंकल्यास त्यांची गुणसंख्या ७ होईल. पण, त्याचवेळी भारत व पाकिस्तान यांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यास झिम्बाब्वेची उपांत्य फेरी निश्चित होऊ शकते. भारताला अशाच धक्कादायक निकालाचा चटका बसल्यास त्यांचीही संधी हुकू शकते.