India T20 World Cup : न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या पराभवानंतर भारताचं सेमी फायनलमधील आव्हान संपुष्टात आलं. त्यामुळे आता भारताला पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० विश्वचषकाच्या तयारीला लागावं लागणार आहे.
भारतातील क्रिकेटच्या चाहत्यांना अफगाणिस्तानचा संघ न्यूझीलंडचा पराभव करेल अशी आशा होती. परंतु केन विल्यमसनच्या टीमनं या आशा धुळीस मिळवल्या. अफगाणिस्तानचा सामन्यात ८ विकेट्सनं पराभव कर किवींनी सेमीफायनलच्या दिशेनं पाऊल पुढे टाकलं.
परंतु हे पहिल्यांदा झालं नाही, जेव्हा न्यूझीलंडनं भारताला टुर्नामेंटमधून बाहेरचा रस्ता दाखवला. सलग तिसऱ्यांदा केन विल्यमसननं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या स्वप्नांवर पाणी फेरलं आहे.
दुबई आणि ओमान येथे खेळवण्यात येत असलेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडच तो संघ आहे ज्यानं भारतीय संघासमोरील आव्हानं वाढवली होती. पाकिस्तान विरोधातील सामन्यानंतर भारतीय संघाला न्यूझीलंडविरोधात सामना जिंकणं आवश्यक होतं. परंतु न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत भारतीय संघाला पराभूत करत त्यांच्यासमोरील आव्हान अजून वाढवलं.
यानंतर न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानला धुळ चारत भारताच्या सेमीफायनलमधील प्रवेशाच्या शक्यताही बंद करून टाकल्या. यापूर्वी जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या फायनलमध्ये किवींनी भारतीय संघाचा पराभव करत क्रिकेटच्या मोठ्या फॉर्मेचा चॅम्पिअन बनण्याचं भारताचं स्वप्न तोडलं होतं.
२०१९ मध्ये ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलमध्ये भारतीय संघाचा पराभव करणारी टीम दुसरी तिसरी कोणती नसून न्यूझीलंडचीच होती. आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत जेव्हा विराट सेनेने केन विल्यमसनच्या टीमचा सामना केला आहे, तेव्हा भारताला पराभवच पत्करावा लागला आहे.
यापूर्वी विराट कोहलीनं टी २० सामन्यांचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ही स्पर्धा कर्णधार म्हणून त्याची अखेरची स्पर्धा होती. परंतु न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यापुढे त्याचं कर्णधार असताना विश्वचषक हाती घेण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं.
संपूर्ण रेकॉर्डबद्दल सांगायचं झालं तर भारतीय संघानं न्यूझीलंडच्या संघाचा २००३ मध्ये अखेरचा पराभव केला होता. त्यानंतर न्यूझीलंडच्या टीमपुढे भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही.
भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळण्याआधीच संपुष्टात आलं. जेतेपदाचे प्रबळ दावेदार अशी हवा केल्यानंतर भारतीय चाहत्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला. पाकिस्ताननं पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला आपटले आणि त्यानंतर उठून उभं राहण्यासाठी त्यांना न्यूझीलंडच्या धक्क्याची वाट पाहावी लागली. भारताचे माजी कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या खराब कामगिरीवर जोरदार टीका केली.
त्यांनी बीसीसीआयकडे भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी वेळापत्रक तयार केलं, काही खेळाडू राष्ट्रीय संघापेक्षा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळण्यास प्राधान्य देत असल्याचेही ते म्हणाले. आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यानंतर भारतीय खेळाडूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळायला हवा होता, असेही कपिल देव म्हणाले.
भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) यानंही बायो बबलमुळे आलेल्या थकव्यावर मत व्यक्त केलं. भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनीही अतिरिक्त कार्यभारामुळे खेळाडू दमल्याचे मान्य केलं.
''जेव्हा खेळाडूच राष्ट्रीय कर्तव्य सोडून आयपीएलमध्ये खेळण्यास प्राधान्य देतात, तेव्हा आपण काहीच बोलू शकत नाही. देशाकडून खेळण्याची संधी मिळाल्याचा खेळाडूंनी अभिमान बाळगायला हवा. मला त्यांची आर्थिक परिस्थिती माहीत नाही, त्यामुळे मी अधिक काही बोलणार नाही, ''असे कपिल देव यांनी ABP News कडे बोलताना मत व्यक्त केलं.