Farewell captain Virat Kohli and coach Ravi Shastri: विराट कोहली ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून आता पुन्हा दिसणार नाही. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडणार असल्याचे विराटनं जाहीर केलं होतं आणि आज त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया अखेरचा ट्वेंटी-२० सामना खेळले. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, आर श्रीधर व भरत अरुण यांचाही कार्यकाळ संपला आणि आता टीम इंडियाला राहुल द्रविड हा नवा प्रशिक्षक मिळाला. पाच वर्ष मुख्य प्रशिक्षकपदावर राहिलेले रवी शास्त्री आज इमोशनल झाले आणि नामिबियाविरुद्धचा सामना संपल्यानंतर त्यांनी विराटला कडकडून मिठी मारली. विराट व शास्त्री यांची चांगलीच जोडी जमली होती
प्रथम फलंदाजीला आलेल्या नामिबियानं धक्के बसूनही २० षटकं खेळून काढताना ८ बाद १३२ धावा केल्या. आर अश्विन ( ३-२०) व रवींद्र जडेजा ( ३-१६ ) यांनी दमदार कामगिरी केली. रोहित शर्मानं भन्नाट कॅच घेतला. जसप्रीत बुमराहनं १९ धावांत २ विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी ( ३९ धावा) व राहुल चहर ( ३० धावा) हे महागडे गोलंदाज ठरले. डेव्हिड विज ( २६) व स्टीफन बार्ड ( २१) यांनी संघर्ष दाखवला. प्रत्युत्तरात रोहित व लोकेश राहुल यांनी वेगवान सुरुवात केली. रोहित ३७ चेंडूंत ७ चौकार व २ षटकार मारून ५६ धावंवर माघारी परतला. राहुलनं ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. राहुल ३६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारासह ५४ धावांवर नाबाद राहिला. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या सूर्यकुमार यादवनं १९ चेंडूंत नाबाद २५ धावा केल्या. टीम इंडियानं १५.२ षटकांत १ बाद १३६ धावा केल्या.
रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतानं ४३ कसोटींत २५ विजय व १३ पराजय पत्करले आहेत. ५ सामने बरोबरीत सुटले. ७६ वन डे पैकी ५१ विजय , २२ पराजय, तर ६५ ट्वेंटी-२०त ४३ विजय व १८ पराजय असा शास्त्री यांचा प्रशिक्षक म्हणून प्रवास आहे. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियानं दोन वेळा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत धुळ चारली. ७० वर्षांनंतर भारतीय संघआनं ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला आशियाई संघ ठरला. ४० महिने भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर होता. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथे मर्यादित षटकांची मालिका जिंकण्याचा पराक्रम.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक मारलेली. २०१९च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम विराटनं केला. आयसीसीच्या सर्व स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणारा ( चॅम्पियन्स ट्रॉफी, वन डे वर्ल्ड कप, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा) विराट हा पहिलाच कर्णधार ठरला आहे.
२०१७मध्ये सर्व प्रकारच्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियानं सलग १२ सामने जिंकण्याचा पराक्रम केला तो विराटच्या नेतृत्वाखाली. २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियात असा पराक्रम करणारा भारत हा पहिलाच आशियाई देश ठरला. भारतानं ७० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत नमवले. २०१०-२० या कालावधीत ट्वेंटी-२०त सलग १० मॅच जिंकण्याचा पराक्रम टीम इंडियानं केला.
विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ५० पैकी ३० ट्वेंटी-२० सामने जिंकले, तर १६ मध्ये पराभव पत्करावा लागला. दोन सामने बरोबरीत सुटले आणि दोन अनिर्णीत राहिले. कर्णधार म्हणून विराटनं ४६ डावांमध्ये १५७० धावा केल्या आहेत. त्यात १३ अर्धशतकं असून नाबाद ९४ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.