भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचा चेहरा म्हणजे जसप्रीत बुमराह. भल्या भल्या फलंदाजांना चीतपट करणारा बुमराह सध्या ट्वेंटी-२० विश्वचषक खेळत आहे. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याने तीन महत्त्वाचे बळी घेऊन शेजाऱ्यांना पराभवाची धूळ चारली.
सामन्यानंतर बुमराहची पत्नी संजना गणेसनने जसप्रीतशी एक स्पोर्ट्स अँकर म्हणून संवाद साधला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
२०१२ मध्ये संजना गणेसनने फेमिना मिस इंडिया स्टाइल दिवा स्पर्धेत भाग घेतला आणि अंतिम फेरी गाठली. येथूनच तिची कारकीर्द सुरू झाली.
६ मे १९९१ रोजी जन्मलेली संजना गणेसन ही प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे. ती मॉडलिंग देखील करायची. ती अनेकदा भारतातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये समालोचन करताना दिसते.
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेसनची पहिली भेट २०१३ च्या आयपीएल दरम्यान झाली होती. त्यावेळी संजनाने जसप्रीत बुमराहची मुलाखत घेतली होती. असे बोलले जाते की या भेटीनंतर दोघांची मैत्री झाली, परंतु त्यानंतर बराच वेळ त्यांच्यात बोलणे झाले नाही.
संजना आणि जसप्रीतची लव्ह स्टोरी खूपच फिल्मी आहे. या दोघांनी बरेच दिवस आपले नाते मीडियापासून दूर ठेवले होते. २०२१ मध्ये जेव्हा जसप्रीत बुमराहला वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली तेव्हा त्यांच्या अफेअरची बातमी पहिल्यांदाच समोर आली होती. लग्नानंतर दोघांनी एकत्र फोटो शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली.
लग्नाआधी जसप्रीत आणि संजना दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. या दोघांनी १५ मार्च २०२१ रोजी गोव्यात लग्न केले.
संजना गणेसन मॉडेल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिने अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरिंग केले आहे.
संजनाने २०१९च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केले होते. सिम्बॉससिस इंस्टीट्यूटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केले. त्यात तिने गोल्ड मेडल पटकावले. त्यानंतर २०१३-१४मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरिंग केले.