Ind Vs Eng: सेमीफायनलमध्ये रोहित शर्माचे ते तीन निर्णय टीम इंडियाला पडले महागात, ओढवली नामुष्की

T20 World Cup 2022, Ind Vs Eng: मोठ्या अपेक्षेने टी-२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियात गेलेल्या भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. काल झालेल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून भारताचा दारुण पराभव झाला.

मोठ्या अपेक्षेने टी-२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियात गेलेल्या भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. काल झालेल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून भारताचा दारुण पराभव झाला.

या पराभवानंतर भारतीय संघाच्या अपयशाची वेगवेगळी कारणे समोर येत आहेत. त्यातच रोहित शर्माच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, सेमीफायनलमध्ये रोहितचे तीन निर्णय भारतीय संघाला महागात पडल्याचे बोलले जात आहे.

भारताने दिलेल्या १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने धडाकेबाज सुरुवात केली. भारताचा मुख्य गोलंदाज असलेल्या भुवनेश्वर कुमारवर बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी हल्लाबोल केला. अशा परिस्थितीत अर्शदीपकडून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा होती. मात्र रोहित शर्माने पॉवर प्लेमध्ये त्याला केवळ एकच षटक टाकण्याची संधी दिली. ही बाब भारतीय संघाचं नुकसान करणारी ठरली.

अक्षर पटेलला संधी देणे नडले सातत्याने फ्लॉप होत असलेल्या अक्षर पटेलला रोहित शर्माने उपांत्य फेरीतही संधी दिली. मात्र रोहितचा हा निर्णय भारतीय संघासाठी नुकसानकारक ठरला. अष्टपैलू म्हणून संघात असलेल्या अक्षर पटेलला फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर आपला प्रभाव पाडता आला नाही. उपांत्य फेरीत इतर गोलंदाजांप्रमाणेच त्याचीही बलटर आणि हेल्सने धुलाई केली.

एकीकडे अॅडिलेडच्या पिचवर आदिल रशिद आणि लियाम लिव्हिंगस्टोनने जबरदस्त गोलंदाजी केली. मात्र रोहित आणि द्रविडने अक्षर पटेलला प्राधान्य देत रिस्ट स्पिनर युझवेंद्र चहलला संपूर्ण स्पर्धेत संघाबाहेर बसवले. चहलला संघाबाहेर बसवणे भारतीय संघाला चांगलेच नुकसानकारक ठरले.

१६९ धावांचे आव्हान दिल्यानंतर क्षेत्ररक्षणासाठी भारतीय संघ जेव्हा मैदानात आला तेव्हा संघाचा पवित्रा बचावात्मक होता. खेळाडूंचे खांदे पडलेले होते. रोहित शर्माने आक्रमक क्षेत्ररक्षणाचा वापर केला नाही. विकेट घेण्याऐवजी धावा रोखण्यावर भर दिला गेला. पण रोहितचं मैदानातील नेतृत्व आणि क्षेत्ररचना अगदीच बचावात्मक झाली. त्याचा फायदा इंग्लंडच्या सलामीवीरांनी पुरेपूर उचलला.