पावसाच्या व्यत्ययानंतर सुधारित लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन मैदानावर उतरलेल्या बांगलादेशचा गड कोसळला. लोकेश राहुलने अचूक थ्रो करताना लिटन दासला रन आऊट केले आणि त्यानंतर मोहम्मद शमीने दुसरा ओपनर नजिमूल शांतोला बाद केले. अर्शदीप सिंगने एका षटकात बांगलादेशला दोन धक्के देताना बांगलादेशवरील दडपण वाढवले.
दरम्यान, पांड्यानेही एका षटकात दोन विकेट्स घेतल्या आणि सारे चित्रच बदलले. विराट कोहली व रोहित शर्मा प्रत्येक विकेटनंतर दमदार सेलिब्रेशन करताना दिसले. भारताने रोमहर्षक विजय मिळवून सेमी फायनलचे तिकिट जवळपास निश्चित केले आहे. पण, बांगलादेशच्या या पराभवाने पाकिस्तानचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
चुरशीच्या झालेल्या या सामन्यात बांगलादेशलाही विजयाची संधी होती. परंतु कर्णधार रोहित शर्माच्या रणनीतीमुळे भारतीय संघानं सामन्यात पुनरागमन केलं. या सामन्यात अर्शदीप आणि हार्दिक पांड्या यांनी दोन दोन विकेट्स घेतल्या. बांगलादेशला अखेरच्या ओव्हरमध्ये २० धावांची गरज होती. परंतु रोहित शर्मानं अनुभवी मोहम्मद शमी ऐवजी अर्शदीपला ओव्हर टाकण्याची संधी दिली.
या सामन्यानंतर रोहित शर्मानं आपल्या या निर्णयाबाब खुलासा केला. शमी ऐवजी अर्शदीपला अखेरची ओव्हर का दिली याबाबत त्यानं माहिती दिली. सोबतच टीम इंडियानं जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत त्याचा पर्याय तयार केल्याचं रोहितच्या वक्तव्यावरून दिसून येतंय.
मी कठीण वेळात शांत आणि निराश होतो. परंतु ठरवल्याप्रमाणेच पुढे जाणं आवश्यक होतं. जेव्हा हाती १० विकेट्स होत्या तेव्हा निकाल कोणाच्याही बाजूने लागला असता. परंतु नंतर आम्ही उत्तम कामगिरी केली, असं रोहित शर्मा म्हणाला.
त्यानं उत्तरं देताना विराट कोहली आणि केएल राहुल यांचं खुप कौतुकही केलं. सोबत भारतीय संघाच्या फिल्डिंगमध्येही सुधारणा झाल्याचं तो म्हणाला. सामन्यादरम्यान अनेक कठीण कॅच आणि धावाही थांबवल्या असल्याचं रोहितनं सांगितलं.
जेव्हा अर्शदीप आला तेव्हा आम्ही त्याला असं करण्यास (विकेट घेण्यास) सांगितलं. बुमराह इकडे नाहीये. अशात कोणालातरी हे करायचंच होतं. जबाबदारी घ्यायचीच होती. खरं सांगायचं तर या तरुण खेळाडूनं पुढे येऊन हे केलं. हे सोप नसतं. परंतु आम्ही त्याला तयार केलं आहे, असं रोहित म्हणाला.
तो गेल्या ९ महिन्यांपासून असं करत आहो. आमच्याकडे शमी आणि त्याच्यापैकी एकाला निवडण्याचा (अखेरच्या ओव्हरसाठी) पर्याय होता. परंतु आम्ही अर्शदीपला निवडलं. यापूर्वीही त्यानं आमच्यासाठी असं केलं आहे, असंही त्यानं स्पष्ट केलं.
अखेरच्या ओव्हरमध्ये बांगलादेशला २० धावांची गरज होती. परंतु अर्शदीपनं उत्तम बॉलिंग केली. त्याच्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार लागला. परंतु यानंतरही त्यानं शांत राहत पुनरागमन केलं. त्यानं सातत्यानं यॉर्कर बॉल टाकत बांगलादेशला बॅकफुटवरच ठेवलं आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला.