ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंड विरुद्धच्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघात खळबळ उडाली आहे. बीसीसीआयकडून चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीची हकालपट्टी केली आहे. गेल्या काही काळापासून भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं निर्णय घेतला आहे.
भारतीय संघाच्या खराब कामगिरीसोबतच संघातील सदस्यांसोबतच्या वादामुळेही निवड समिती चर्चेचं केंद्रस्थान राहिली आहे. आशिया चषकापाठोपाठ वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या पराभवानंतर बीसीसीआयनं याविरोधात कठोर पाऊल उचलत संपूर्ण निवड समितीच्या बरखास्तीची घोषणा केली. यानंतर आता निवड समितीचे कोहली आणि द्रविड सोबतच्या वादाचे मुद्दे समोर आले आहेत.
चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीचा पहिला मोठा वाद संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसोबत झाला होता. विराट कोहीलनं जेव्हा ट्वेन्टी-२० वर्ल्डकपआधीच संघाच्या कर्णधारपदावरुन पायऊतार होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कोहलीकडून वन-डे संघाचंही कर्णधारपद काढून घेण्यात आलं. पुढे कोहलीनं कसोटी कर्णधारपदही सोडलं. यादरम्यान दोन्ही बाजूनं एकमेकांविरोधात विधानं केली गेली. कोहली आणि निवड समिती सदस्यांच्या विधानांमध्ये बरीच तफावत आढळून आली.
रिपोर्ट्सनुसार हेड कोच राहुल द्रविडसोबतही निवड समितीचे खटके उडाले होते. प्रॅक्टीस सेशनमध्ये निवड समितीच्या हस्तक्षेपावरुन राहुल द्रविड नाराज होते. निवड समितीतील काही सदस्य प्रॅक्टीस सेशनमध्ये येत असत आणि याच मुद्द्यावरुन संघ व्यवस्थापनानं नाराजी व्यक्त केली होती. यातच आयपीएल २०२२ च्या काळात राहुल द्रविड आणि चेतन शर्मा यांच्यातही वाद झाला होता.
बीसीसीआयच्या सुत्रांच्या माहितीनुसार निवड समितीनं ज्या पद्धतीनं २०२१ च्या वर्ल्डकपपासून ते २०२२ च्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये संघाच्या कर्णधारांमध्ये बदल केला यामुळे संघात योग्य संदेश गेला नाही. या काळात संघात जवळपास सहा वेळा कर्णधार बदलेले गेले. त्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. तसंच वर्कलोड मॅनेजमेंटच्या नावावर घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे गोष्टी आणखी बिघडत गेल्या.
रोहित शर्मा संघाचा कर्णधार झाल्यानंतर भारतीय संघाला द्वीपक्षीय सीरिजमध्ये विजय प्राप्त करता आला. पण मोठ्या स्पर्धांमध्ये संघ पराभवाला सामोरा जात होता. आशिया चषकात भारतीय संघाला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. यावेळी निवड समितीच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं होतं.
ट्वेन्टी-२०२२ वर्ल्डकपमध्येही भारतीय संघाचा पराभव झाला. याआधी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाचाही आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये पराभवाचा मुद्दा अग्रस्थानी होता. आता तोच कित्ता गिरवला गेला. ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी ज्या पद्धतीनं संघाची निवड करण्यात आली त्यावर संघ व्यवस्थापनासह निवड समितीचे सदस्य देखील निशाण्यावर होते.
आता संघाचे वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार असू शकतात अशी गोष्ट आता चर्चेचा मुद्दा बनली आहे. याआधीच्या निवड समितीनं मात्र तिन्ही फॉरमॅटसाठी एकच कर्णधार हवा अशी भूमिका घेत रोहित शर्माला जबाबदारी सोपावली होती.
आता बीसीसीआयनं नव्या निवड समितीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. आता संघाला नवं नेतृत्व आणि नव्या फॉर्म्युलासह मैदानात उतरवण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. जेणेकरुन २०२४ सालच्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय ट्वेन्टी-२० संघ बांधला जाऊ शकेल.