ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघांचं आव्हान सुपर-१२ मध्येच संपुष्टात आलं. भारतीय संघ वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर जाताच रवी शास्त्री यांचाही संघाच्या प्रशिक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. पदावरुन दूर झाल्यानंतर रवी शास्त्री यांनी आता भारतीय संघ निवडीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी जो भारतीय संघ निवडला गेला त्या निवड प्रक्रियेत माझा आणि कर्णधार विराट कोहलीचा कोणताही सहभाग नव्हता, असा खळबळजनक दावा रवी शास्त्री यांनी केला आहे. एका टेलिव्हिजन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंबंधिचा गौप्यस्फोट केला आहे.
'मी संघ निवडीत सामील नव्हतोच. मी फक्त अंतिम ११ खेळाडू कोणते खेळवायचे या चर्चेचा भाग होतो. वर्ल्डकपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ निवड समितीनं निवडला होता. यात माझी किंवा अगदी कर्णधार विराट कोहलीची देखील सहमती घेण्यात आली नव्हती', असं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.
इतकंच नव्हे, तर सामन्यांच्या वेळापत्रकावरुन रवी शास्त्री यांनी जोरदार टीका केली. 'मी कोणताही बहाणा करत नाही. पण सामन्यांचं वेळापत्रक आणखी चांगलं करता आलं असतं. तुम्ही बायो-बबलमध्ये आहात आणि पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध पराभूत झाल्यानंतर तब्बल आठवडाभर बसून राहता. सरावाला वेळ मिळतो ही गोष्ट बरोबर असली तरी यात दुखापतीचा देखील मोठा धोका असतो. त्यामुळे जास्त सराव करणंही योग्य नाही', असं रवी शास्त्री म्हणाले.
भविष्यात एका संघाच्या सामन्यांच्या कालावधीत सात दिवसांपेक्षा अधिकच अंतर नसावं असं मला वाटतं. सात दिवसांच्या आतच संघाचा सामना व्हायला हवा. मग तो कोणत्याही संघा विरुद्ध का असेना, असंही रवी शास्त्री म्हणाले.
भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये रवी शास्त्री आणि कोहलीचा दादागिरीच्या आरोपावर देखील त्यांनी भाष्य केलं. 'मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. ड्रेसिंग रुममध्ये काय वातावरण असतं हे माझं मला माहित आहे. लोक शक्यता आणि अंदाज व्यक्त करत असतात. लोक लिहू शकतात, पण संघ स्कोअरबोर्डवर किती धावसंख्या लिहीतोय हेत लोक लक्षात ठेवतात', असं रवी शास्त्री म्हणाले.
इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघात आलबेल नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. काही सिनिअर खेळाडूंनी कर्णधार कोहलीच्या वागण्यावर आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली होती. खेळाडूंनी याबाबत बीसीसीआयकडे तक्रार केल्याचंही बोललं जात होतं.
दरम्यान, संघाच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार झाल्यानंतर शास्त्रींनी संघ निवडीबाबतचा पहिला बॉम्ब टाकला असल्याचं आता बोललं जात आहे. त्यामुळे आगामी काळात शास्त्रींकडून आणखी काही आरोप केले जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. संघ निवडीत आपला सहभाग नव्हता आणि सहमती देखील विचारली गेली नव्हती असं सांगून शास्त्रींनी थेट बीसीसीआयच्या व्यवस्थापनावरच अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.