भारत आणि पाकिस्तान २०१९ नंतर दोन वर्षांनी परस्परांविरुद्ध खेळणार असल्याने चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. भारताने पाकविरुद्ध आतापर्यंत ८ टी-२० सामने खेळले असून यापैकी सहा सामने जिंकले आहेत. वन डे वर्ल्डकपमध्ये २०१९ साली इंग्लंडच्या मॅन्चेस्टर मैदानावर भारताने पाकवर मात केली होती.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं महत्त्व चांगलंच ठावूक असल्यानं भारतीय खेळाडू नेट्समध्ये घाम गाळताना दिसत आहेत. यात भारतीय संघाचा ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी मेन्टॉर म्हणून नियुक्ती करण्यात आलेला महेंद्रसिंग धोनी भारतीय खेळाडूंवर नेट्समध्ये सरावावेळी विशेष लक्ष ठेवून असल्याचं दिसून आलं.
महेंद्रसिंग धोनी नेट्समध्ये सराव करत असलेल्या प्रत्येक खेळाडूची भेट घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेत होता आणि काही टिप्स देखील देत होता. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याची रणनिती नेमकी कशी असावी याची कोहली आणि धोनीमध्ये नक्कीच चर्चा झालेली असावी. आता कोहली ब्रिगेड मैदानात कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
धोनीने गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्यानंतर धोनी भारतीय संघापासून दूर होता. पण आता ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी बीसीसीआयनं धोनीची संघाच्या मेन्टॉरपदी नियुक्त केली आहे. याचा भारतीय संघाला मोठा फायदा होणार आहे.
विराट आणि रोहितसाठी पडद्यामागून भारतीय संघाच्या विजयाची स्क्रिप्ट आता धोनीच लिहीणार आहे. संघाच्या प्लानिंगमध्ये धोनीचा सिंहाचा वाटा असणार आहे. सामना सुरू असताना ड्रिंक्स ब्रेकवेळी परिस्थितीनुसार संघाच्या रणनितीत बदल करण्याची जबाबदारी धोनीवर असणार आहे.
भारतीय संघाला फक्त पाकिस्तान विरुद्धचा सामना नव्हे, तर संघाला पुन्हा एकदा ट्वेन्टी-२० चॅम्पियन बनविण्याची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीवर आहे. २००७ साली धोनीच्या नेतृत्त्वाखालील युवा ब्रिगेडनं ट्वेन्टी-२० विश्वचषक उंचावला होता.
भारतीय टीमच्या नेट्समध्ये मेंटॉर महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) थ्रो डाऊन स्पेशालिस्टच्या भूमिकेतही दिसला. धोनी नेट्समध्ये आपल्या अनुभवातून कोहली ब्रिगेडचा सराव करुन घेत आहे.
धोनीनं नेट्समध्ये फलंदाजांचा सराव तर घेतलाच पण यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि इशान किशन यांनाही तो यष्टीमागे चपळता कशी ठेवावी याचं ट्रेनिंग देत असल्याचंही दिसून आलं.