Ind Vs Pakistan Live Match Highlight : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आणखी एक कधी न केलेला पराक्रम आज केला. हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंग यांनी पाकिस्तानला हादरवून सोडले. भुवी व आवेश खान यांनी सुरुवातीला धक्के दिल्यानंतर हार्दिकने ३ विकेट्स घेत पाकिस्तानची मधली फळी विस्कळीत करून टाकली. अर्षदीप सिंग व आवेश खान यांनीही धक्के दिले. भुवनेश्वर कुरमाने २६ धावांत ४ विकेट्स घेतली आणि पाकिस्तानविरुद्ध ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
बाबर आजम ( १०) अपयशी ठरल्यानंतर मोहम्मद रिझवान ( ४३) व इफ्तिखार अहमद ( २८) यांनी डाव सावरला. शाहनवाज दहानीने ६ चेंडूंत १६ धावा करून पाकिस्तानला १४७ धावांपर्यंत मजल मारून दिली. भुवीने या विकेटसह एका वर्षात पहिल्या सहा षटकांत सर्वाधिक १३ विकेट्स घेण्याच्या आशिष नेहराच्या ( २०१६) विक्रमाशी बरोबरी केली.
ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ४ किंवा त्यापेक्षा विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत भुवनेश्वर कुमारने संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले. त्याने चारवेळा अशी कामगिरी करताना जोश हेझलवूड ( ऑस्ट्रेलिया) व मुस्ताफिजूर रहमान ( बांगलादेश) यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. पाकिस्तानच्या उम्रान गुलने ६ वेळा अशी कामगिरी केली आहे.
पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत भुवनेश्वर कुमारने ८ विकेट्ससह अव्वल स्थान पटकावले आहे. हार्दिक पांड्या ( ७), इऱफान पठाण ( ६), अशोक दिंडा ( ४) व रवींद्र जडेजा ( ४) हे त्याच्या मागोमाग आहेत.
ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताच्या जलदगती गोलंदाजांनी प्रथमच सर्वच्या सर्व १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. भुवीने ४ ( २६ धावा ) , अर्षदीप सिंगने २ ( ३३ धावा), हार्दिक पांड्याने ३ ( २४ धावा) व आवेश खानने १ ( १९ धावा) विकेट घेतली.
१९ वर्षीय गोलंदाज नसीम शाहने पदार्पणाच्या सामन्यात दमदार सुरुवात केली. पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर त्याने लोकेश राहुलला Golden Duck वर बाद केले. चौथ्या चेंडूवर विराट कोहलीचा स्लीपमध्ये झेल सुटल्याने भारताला दुसरा धक्का बसता बसता राहिला.