हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?

Suryakumar Yadav Gautam Gambhir Clash : संघ जाहीर करण्याच्या काही मिनिटं आधी अचानक सूर्याला सांगण्यात आलं होतं खेळाडूचं नाव

यूएईमध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेत भारताने आपले वर्चस्व सिद्ध करत विजेतेपद पटकावले. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने स्पर्धेत पाकिस्तानवर तीनदा विजय मिळवला.

भारतीय संघाने पाकिस्तानी संघाला क्रिकेटच्या मैदानावर चांगलाच धडा शिकवला. पण या विजेतेपदाच्या यशाआधी संघ निवडीदरम्यान झालेल्या एका वादाची सध्या चर्चा रंगली आहे.

CricBloggerच्या अहवालानुसार, भारतीय टी२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा वरच्या फळीतील फलंदाज शुभमन गिलच्या संघातील समावेशाबाबत पूर्णपणे समाधानी नव्हता.

गिलचा खेळ भारताच्या सध्याच्या आक्रमक टी२० पद्धतीला साजेसा नाही. गिलची संथपणे खेळण्याची पद्धत भारताच्या वेगवान खेळाला बाधक ठरू शकते, असे सूर्याचे मत होते.

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीने मात्र गिलच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे आणि तीनही फॉरमॅटमधील महत्त्व दाखवून दिले. त्यामुळे शेवटी त्यांचा निर्णयच मान्य करण्यात आला.

संघाची अधिकृत घोषणा होण्याच्या काही वेळ आधी सूर्यकुमारला गिलच्या समावेशाबाबत सांगण्यात आल्याने सूर्या काहीसा अचंबित होता, पण नंतर त्याने तो निर्णय मनापासून स्वीकारला.

गिलची निवड हे भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी सकारात्मक पाऊल असल्याचे त्याने म्हटले होते. सध्या वनडे, कसोटी संघाचे नेतृत्व करणारा गिल भविष्यात टी२० संघाचा कर्णधार होऊ शकतो.