Sunil Gavaskar Team India ODI World Cup 2023: वन डे वर्ल्ड कप जिंकून भारताचा दहा वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचे लक्ष्य सध्या रोहित शर्मा आणि टीम इंडियासमोर आहे. सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर २ कसोटी, ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गेला आहे.
भारत आयर्लंड दौरा (ट्वेंटी२०), आशिया चषक(वन-डे), ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान यांच्या विरुद्ध वन डे मालिका खेळणार आहे. वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघ अधिकाधिक वन डे सामने खेळण्यावर भर देत आहे.
वन डे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर झाले असून भारताच्या सुरूवातीचे सामने ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्याशी होणार आहेत. याचा भारताला फायदाच होणार असल्याचे मत लिटल मास्टर सुनील गावसकरांनी व्यक्त केले.
भारतीय संघाच्या पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने हे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोघांशी होणार आहेत. या दोन संघाशी होणाऱ्या सामन्यांबद्दल सुनील गावसकरांनी एक मत व्यक्त केले.
'पाकिस्तान, ऑस्ट्रेलियासारख्या संघासोबत जर करो या मरोच्या सामन्यात झुंज झाली तर त्यांच्यासारख्या बलाढ्य संघाशी दोन हात करताना भारतीय संघाची कसोटी लागली असती. त्यामुळे त्यांच्याशी आपला सामना आधीच होऊन जाणार आहे ही भारतासाठी फायद्याची गोष्ट आहे,' असे गावसकर म्हणाले.
'जर तुम्हाला पहिल्या काही सामन्यांमध्ये चांगला निकाल मिळू शकला नाही तर तुम्हाला स्पर्धेत पुढे खेळताना विविध संधी मिळू शकतात. जर तुम्ही नंतर एखाद्या तुलनेने कमकुवत संघाशी खेळत असाल तर तुम्हाला सुरूवातीच्या काळात झालेल्या चुकांवर मात करून स्पर्धेत पुनरागमन करता येऊ शकते,' असेही गावसकरांनी स्पष्ट केले.