Sri Lanka team Victory Parade : आशिया जिंकून श्रीलंकन संघ मायदेशात परतला, double-decker bus मधून निघाली विजयी मिरवणूक, PHOTO

Sri Lanka team Victory Parade : श्रीलंकेने आशिया चषक २०२२ स्पर्धा जिंकून देशवासियांना आनंद दिला.. आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेसाठी हा खूप मोठा विजय आहे.

Sri Lanka team Victory Parade : श्रीलंकेने आशिया चषक २०२२ स्पर्धा जिंकून देशवासियांना आनंद दिला.. आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेसाठी हा खूप मोठा विजय आहे. याच संकटामुळे आशिया चषक त्यांच्या देशातून दुबईला हलवला गेला. त्यात पहिल्या सामन्यात हार मानावी लागल्यानंतर त्यांच्याकडून जेतेपदाच्या अपेक्षाच कुणी केल्या नव्हत्या. पण, हा संघ उभा राहिला आणि एकमागून एक विजय मिळवून जेतेपदाचा चषक उंचावला.

आशिया चषक जिंकून मायदेशात परतलेल्या श्रीलंकन संघाचे कोलंबोत जंगी स्वागत केले गेले. दासून शनाकाच्या नेतृत्वाखालील संघाने जेतेपदाच्या सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवला आणि मंगळवारी पहाटे ५ वाजता संघ कोलंबोत दाखल झाला. श्रीलंका क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी आणि क्रीडा मंत्री यांनी खेळाडूंचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर सकाळी खेळाडूंची ओपन डेक बसमधून मिरवणूक काढण्यात आली.

अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही आणि एकामागून एक विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. आशिया चषक २०२२ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी पाकिस्तानला २३ धावांनी हार मानावी लागली. वनिंदू हसरंगा व भानुका राजपक्षा या दोघांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेने हा विजय मिळवला. २०१४नंतर प्रथमच श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धा जिंकली आहे.

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्रही न ठरलेल्या श्रीलंकेकडून आशिया चषक विजयाची अपेक्षा कुणी केलीच नव्हती. ३ सप्टेंबरला जेव्हा आशिया चषक २०२२ चा जेता कोण असेल असा पोल घेतला गेला, तेव्हा सर्वाधिक ६९ टक्के मत भारताच्या बाजूने होती, त्यापाठोपाठ पाकिस्तान, अफगाणिस्तान यांचा क्रमांक होता. श्रीलंकेच्या वाट्याला शून्य टक्के मतं आली.

अंतिम सामन्यात प्रमोद मदुशान ( ४-३४) आणि वनिंदू हसरंगा ( ३-२७) यांनी ७ विकेट्स घेत पाकिस्तानचा संपूर्ण संघ १४७ धावांत तंबूत पाठवला. भानुका राजपक्षाने ७१ धावांची खेळी करताना व हसरंगासोबत ५८ धावांची भागीदारी करून ५ बाद ५८ अशा अवस्थेत असणाऱ्या श्रीलंकेला ६ बाद १७० धावांपर्यंत मजल मरून दिली. राजपक्षाने ४५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७१ धावा केल्या.

१९८४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकही ट्वेंटी-२०त खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते. २०१८मध्ये पुन्हा वन डे फॉरमॅटमध्ये आशिया चषक झाला आणि तेव्हाही भारताने बाजी मारली. आतापर्यंत झालेल्या १३ पर्वांत भारताने सर्वाधिक ७ जेतेपदं पटकावली आहेत. सहा जेतेपदांसह श्रीलंका दुसऱ्या आणि दोन विजयासह पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे.