भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( BCCI) १८ ऑक्टोबरला वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. या सभेत नव्या अध्यक्षाबाबद निर्णय घेतला जाणार असून भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) या पदावर कायम राहणार नसल्याची चर्चा आहे. पण, म्हणून जय शाह ( Jay Shah) या पदावर येतील अशी चर्चा होती आणि ती चर्चाच राहिली. आता या पदासाठी एक नवं अनपेक्षित नाव समोर आलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नुकताच बीसीसीआयला दिलासा दिला. BCCI च्या सध्याच्या नियमांनुसार कोणतीही व्यक्ती राष्ट्रीय आणि राज्य मंडळात सलग सहा वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर राहू शकत नव्हती. त्याला ३ वर्षांच्या विराम काळाचा नियम पाळावा लागत होता. या नियमांनुसार गांगुली आणि शाह यांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपला.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे शाह आणि गांगुली यांचा ३ वर्षांनी कार्यकाळ वाढला आहे. खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार, संबंधित उमेदवार राज्य संघटनेत सहा वर्ष अर्थात दोन टर्म सेवा देऊ शकतो आणि नंतर कूलिंग ऑफ कालावधीची आवश्यकता न घेता बीसीसीआय पदाधिकारी होऊ शकतो. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर BCCI वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्याची शक्यता आहे. त्यानुसार यात नव्याने निवडणूका होणार आहेत.
सौरव गांगुली ही निवडणूक लढवणार नसल्याचे वृत्त समोर ले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत ( ICC) भारताचा प्रतिनिधी म्हणून गांगुली जाण्याची शक्यता आहे. पण, दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार जय शाह हेही BCCI चे अध्यक्ष होणार नाहीत. या शर्यतीत माजी खेळाडू रॉजर बिन्नी ( Roger Binny) यांचे नाव समोर आले आहे.
काल यासंदर्भात एक बैठक पार पडली आणि त्यात गांगुलीसह सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, खजिनदार अरुण धुमाल आणि माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन हेही उपस्थित होते. जय शाह हे पुन्हा सचिव पदासाठी निवडणूक लढवणार आहेत. १२ ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची अखेरची तारीख आहे.
कर्नाटक क्रिकेट असोसिएशने रॉजर बिन्नी यांचे नाव वार्षिक सर्वसाधारण मिटींगसाठी प्रतिनिधी म्हणून दिले आहे. ३८ पैकी ३५ राज्य संघटनांनी त्यांच्या प्रतिनिधिंची नावे जाहीर केली आहेत. रेल्वे, सर्व्हिस व युनिव्हर्सिटी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे थोडा वेळ मागितला आहे.