टीम इंडियाच नव्हे तर महिला वनडेतील 'क्वीन' स्मृती मानधना आणि प्रसिद्ध संगीतकार आणि चित्रपट निर्माता पलाश मुच्छल यांच्यातील प्रेमाचं गाणं पुन्हा एकदा ट्रेडिंगमध्ये आलं आहे.
फिल्डबाहेरील रंगलेल्या प्रेमाच्या खेळात स्मृती मानधनाने वेळोवेळी आपल्या राजकुमारावर प्रेमाची 'बरसात' करत 'खुल्लमखुल्ला प्यार करेंगे हम दोनो' हे गाणं गायल्याचे पाहायला मिळाले आहे.
दोघांनी एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची गोष्ट फोटोच्या माध्यमातून जगजाहिर केल्यावर ही जोडी लग्नबंधनात कधी अडकणार? असा प्रश्न चर्चेत आला. आता या प्रश्नाच उत्तर मिळालं आहे.
पलाश मुच्छल आपल्या आगामी 'राजू बाजे वाला' या चित्रपटाच्या चित्रकरणासाठी इंदूरमध्ये आला होता. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्याने स्मृतीसोबत आयुष्यातील नव्या इनिंगसंदर्भातील खास गोष्ट शेअर केली.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना ज्यावेळी त्याला स्मृती मानधनासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी तो म्हणाला की, 'ती (स्मृती मानधना) लवकरच इंदूरची सून होईल एवढंच मी सांगेन.'
स्मृती सोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची हिंट देताना पलाशनं इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी स्मृतीसह भारतीय महिला संघाला शुभेच्छाही दिल्याचे पाहायला मिळाले.
स्मृती मानधना ही क्रिकेटच्या मैदानातील क्वीन म्हणून ओळखली जाते. दुसऱ्या बाजूला तिच्या मनात भरलेला 'राजकुमार' अर्थात पलाश मुच्छल हा मनोरंजन क्षेत्रातील 'बादशहा' म्हणून नावारुपाला येत आहे.
गेल्या दोन तीन वर्षांपासून या जोडीची प्रेम कहाणी गाजत आहे. एकमेकांसोबत बर्थडे साजरा करण्यापासून ते अगदी कुटुंबियातील खास कार्यक्रमात जोडी एकत्र स्पॉट झाली आहे.
पलाश मुच्छल हा बऱ्याच वेळा स्मृती मानधनाच्या मॅच वेळी स्टेडियमवर जाऊन तिला चीअर करतानाही पाहायला मिळाले आहे.
स्मृती-पलाश लग्न बंधनात अडकणार ही गोष्ट पक्की झाल्यावर आता ते लग्नाचा मुहूर्त कधी काढणार? त्याची दोघांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता असेल.