महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाची सुरूवात मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या स्पर्धेच्या फ्रँचायझींच्या विक्रीतून 4,670 कोटींचा गल्ला कमावला. खरं तर ही रक्कम 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझींच्या लिलावाद्वारे बीसीसीआयने कमावलेल्या रकमेपेक्षा जास्त आहे. त्यावेळी 8 IPL फ्रँचायझी 2,850 कोटींपेक्षा जास्त रकमेत विकल्या गेल्या होत्या.
महिला प्रीमियर लीग 2023 साठी खेळाडूंचा लिलाव फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात महिला प्रीमियर लीगचा थरार रंगण्याची शक्यता आहे.
भारताच्या वरिष्ठ महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाला आगामी लिलावात मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे. स्मृतीने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये आपल्या शानदार खेळीने छाप सोडली आहे. तिने महिला बीग बॅश लीगमध्ये (WBBL) 132च्या सरासरीने 784 धावा केल्या आहेत.
भारताच्या संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही देखील ट्वेंटी-20 मधील स्फोटक फलंदाज म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे महिला प्रीमियर लीगच्या फ्रँचायझी लिलावात हरमनप्रीतला अधिक प्राधान्य देतील.
ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू ॲशलेह गार्डनर ही महिला प्रीमियर लीगमध्ये फ्रँचायझींना अधिक आकर्षित करू शकते. एकहाती सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता असलेल्या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूने बीग बॅश लीगमध्ये सर्वांना प्रभावित केले आहे. 67 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गार्डनरच्या नावावर 1,066 धावांची नोंद आहे.
इंग्लंडची स्टार खेळाडू सोफी एक्लेस्टोन ही आताच्या घडीला सर्वोत्तम ट्वेंटी-20 गोलंदाजांपैकी एक आहे. संघाला गरज असताना मोठे फटकार मारण्याची क्षमता असलेली इंग्लंडची अष्टपैलू सोफी महिला प्रीमियर लीगच्या फ्रँचायझींना आकर्षित करू शकते.
तसेच भारतीय संघाची 25 वर्षीय अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा आपल्या हुशार खेळीसाठी जगभर प्रसिद्ध झाली आहे. तिने भारताकडून खेळताना 84 सामन्यांमध्ये 92 बळी घेतले आहेत. याशिवाय यशस्वी फिनीशर म्हणून देखील दीप्तीची कामगिरी चमकदार राहिली आहे.
18 वर्षीय फलंदाज श्वेता सेहरावतला त्यांच्यासोबत जोडण्यासाठी WPLच्या पाचही फ्रँचायझींमध्ये स्पर्धा होऊ शकते. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ICC अंडर-19 महिला ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेत श्वेता सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. तिने 7 डावात 139.43 च्या स्ट्राईक रेटने एकूण 297 धावा केल्या आहेत.
भारताच्या विश्वविजेत्या संघाची कर्णधार शेफाली वर्मा स्फोटक फलंदाजीसाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. शेफालीच्या नेतृत्वात भारताच्या महिला अंडर-19 संघाने 2023च्या विश्वचषकावर आपले नाव कोरले.
भारताची अष्टपैलू खेळाडू अर्चना देवी हिने अंडर-19 विश्वचषकात आपली छाप सोडली आहे. 18 वर्षीय अर्चनाने फायनलच्या सामन्यात 2 महत्त्वाचे बळी पटकावले. अर्चनाने अंडर-19 विश्वचषकात 7 सामन्यांत 8 बळी घेतले.
16 वर्षीय फिरकीपटू पार्श्वरी चोप्राने अंडर-19 विश्वचषकामध्ये भारताकडून सर्वाधिक 11 बळी घेतले. लक्षणीय बाब म्हणजे या महिला क्रिकेटरची गोलंदाजीची सरासरी केवळ 3.76 एवढी राहिली.