Join us  

Shahid Afridi, India vs Pakistan: "पाकिस्तानची आता तेवढी लायकीच नाही की..."; आफ्रिदीने स्वत:च्याच देशाची लाज काढली!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 12:59 PM

Open in App
1 / 9

Shahid Afridi, India vs Pakistan: पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि तडाखेबाज फलंदाज शाहिद आफ्रिदी हा त्याच्या विविध विधानांमुळे कायमच चर्चेचा विषय ठरतो. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील राजकीय व क्रिकेट संबंधांबद्दल आफ्रिदी अनेकदा रोखठोक मतं मांडताना दिसतो.

2 / 9

गेल्या दशकभरापासून भारत आणि पाकिस्तानचा संघ ICC च्या स्पर्धा वगळता एकमेकांशी क्रिकेट खेळत नाहीत. त्यावरूनही शाहिद आफ्रिदी आणि इतर माजी पाकिस्तानी खेळाडूंनी अनेकदा भाष्य केले आहे. पण त्या-त्या वेळी भारतीय फॅन्स आणि क्रिकेटपटूंकडून त्यांना 'जशास तसे' उत्तर देण्यात आले आहे.

3 / 9

याच दरम्यान आगामी आशिया कप २०२३ साठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार का? तसे नसेल तर पाकिस्तान संघ भारतात होणारा वन डे विश्वचषक खेळण्यास नकार देईल का? असे केल्यास पाकिस्तानचे किती नुकसान होईल? या सर्व प्रश्नांची शाहिद आफ्रिदीने उत्तरे दिली आणि त्यासोबतच पाकिस्तानचीच लाज काढली.

4 / 9

एका पाकिस्तानी टीव्ही कार्यक्रमादरम्यान आफ्रिदी म्हणाला, 'पाकिस्तानची सध्याची लायकी पाहता त्यांच्यात एवढी धमकच नाही की ते कोणतीही भूमिका घेऊ शकतील. पाकिस्तान स्वत: आर्थिक दुर्बल देश आणि क्रिकेट बोर्ड असल्यामुळे जगासमोर हात पसरून उभा आहे.'

5 / 9

नेहमी भारताच्या नावाने बोटं मोडणाऱ्या आफ्रिदीने भारताचे कौतुक केले. 'भारत आणि त्यांचे क्रिकेट बोर्ड आता जे काही मागणी करताना दिसत आहे, त्यासाठी त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मेहनत घेऊन स्वत:ला पात्र ठरवले आहे,' असे तो म्हणाला.

6 / 9

आशिया चषकाबाबत भारताच्या भूमिकेवर आफ्रिदी म्हणाला, 'जेव्हा एखादा देश आपल्या पायावर उभा राहत नाही, तेव्हा त्यांच्यासाठी निर्णय घेणे इतके सोपे नसते. अनेक गोष्टी पाहाव्या लागतात. भारत 'अरे ला कारे' करण्याच्या स्थितीत आहे. त्यांनी स्वत:ला तितके बलशाली बनवले आहे. त्यामुळे ते हे सांगू शकतात.'

7 / 9

'तुम्ही स्वत:ला मजबूत करा आणि मग निर्णय घ्या. आशिया चषकात भारत येईल की नाही किंवा पाकिस्तान भारतात जाईल की नाही याची मला कल्पना नाही. पण पाकिस्तान बोर्डाला काहीतरी भूमिका घ्यावी लागेल. ICC ची भूमिका खूप महत्त्वाची असायला हवी होती, ICC ने पुढे यायला हवे होते. पण भारतीय क्रिकेट बोर्डासमोर आयसीसीही काही करू शकणार नाही.'

8 / 9

'मी आता भावनिक होऊनही म्हणेन की जाण्याची गरज नाही. पण हे निर्णय अतिशय विचारपूर्वक घेतले जातात. अनेक गोष्टी पाहाव्या लागतात. तुम्हाला तुमची आर्थिक व्यवस्था पाहावी लागेल. सध्या तुमची आर्थिक स्थिती खूपच वाईट आहे. अशा परिस्थितीत भावनिक होऊन निर्णय घेता येणे शक्य नाही.'

9 / 9

दरम्यान, आगामी विश्वचषकासाठी पाकिस्तान भारतात आला नाही तर त्यांचे ३० दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होईल. दक्षिण आफ्रिकेलाही याचा मोठा फायदा होणार आहे. त्यांना क्वालिफायर खेळावे लागणार नाही आणि थेट प्रवेश मिळेल. दुसरीकडे भारताने आशिया चषक पाकिस्तानऐवजी अन्य कुठल्या तरी देशात आयोजित करण्याचा पर्याय दिला आहे. आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळण्यास भारताने नकार दिला आहे.

टॅग्स :ऑफ द फिल्डभारतपाकिस्तानएशिया कप 2022बीसीसीआयशाहिद अफ्रिदी
Open in App