Shahid Afridi Pakistan Cricket Board | पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी सतत काही ना काही विधाने केल्यामुळे चर्चेत असतो. बरेच वेळा भारताविरोधात किंवा मोदी सरकारविरोधात केलेल्या विधानांमुळे चर्चेत येतो.
आफ्रिदीने भारताविरोधात विधाने केली तर भारतीय क्रिकेटपटू आणि नागरिक त्याला चांगलंच उत्तर देतात. पण त्यासोबतच नेटकरीदेखील सोशल मीडियावर त्याचा चांगलाच समाचार घेतात.
असे असले तरी यावेळी मात्र शाहिद आफ्रिदीने थेट पाकिस्तान क्रिकेट बोर्डावरच संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलेला एक निर्णय म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे, असं रोखठोक मत त्याने व्यक्त केले आहे.
शाहिद आफ्रिदी म्हणाला, 'पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलेला निर्णय अतिशय मूर्खपणाचा होता. पाक बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी मी काही सांगायला जाणार नाही, पण मुख्य निवडकर्ता मोहम्मद वसीम यांना मी नक्कीच सल्ला देईन'
'जर मोहम्मद वसीम ऐकत असतील, तर मी त्यांना सांगू इच्छितो की अशा पद्धतीचं पाऊल त्यांनी पुन्हा उचलू नये. तरुण खेळाडूंच्या समावेशाला माझाही पाठिंबा आहे पण किमान त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळू द्या', असे आफ्रिदीने सांगितले.
'तुम्ही वन डे क्रिकेटमध्ये मोहम्मद हारिस याच्यासारखा खेळाडू कसा काय निवडता, जो केवळ दोन टी२० सामने खेळला आहे. त्यातही त्याची कामगिरी चांगली नाही. हारिसची कामगिरी टी२० ती कामगिरीच्या आधारे झाली असेल तर त्याला टी२० खेळवा', असं रोखठोक मत आफ्रिदीने व्यक्त केले.