मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. सचिनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दलची एक अनोखी माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. सचिननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करत जगात भारताचं नाव केलं. पण सचिन भारताकडून खेळण्याआधी पाकिस्तानकडून खेळला होता हे तुम्हाला माहित्येय का?
होय, हे खरंय. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण असं घडलं होतं आणि तेही भारतातच हा सामना खेळविण्यात आला होता. २४ एप्रिल १९७२ रोजी सचिनचा जन्म झाला. तर १९८९ साली सचिननं भारतीय संघात पदार्पण केलं. त्यानंतर तब्बल २४ वर्ष सचिननं क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं. पण सचिनचं पदार्पण होण्याआधी त्याला पाकिस्तानकडून खेळण्याची संधी मिळाली होती.
अर्थात तो कोणताही आंतरराष्ट्रीय सामना नव्हता. पण पाकिस्तानविरुद्ध भारतात खेळविण्यात आलेल्या सामन्यात जवळपास अनेक खेळाडू हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच होते. त्यामुळे हा सामना अतिशय महत्वाचा होता.
तर ही गोष्ट आहे २० जानेवारी १९८७ सालची. सचिन तेव्हा १३ वर्षांचा होता. पाकिस्तानचा संघ त्यावेळी भारत दौऱ्यावर आला होता. इमरान खान तेव्हा पाकिस्तानचे कर्णधार होते. भारत आणि पाकिस्तानमध्ये तेव्हा कसोटी मालिका खेळविण्यात आली होती. याच दरम्यान मुंबई क्रिकेट क्लब ऑफ इंडियाची गोल्डन ज्युबली देखील होती आणि एक मैत्रिपूर्ण सामना खेळविण्यात आला होता.
मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान मैत्रिपूर्ण लढत खेळविण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय स्वरुपाचा सामना नसल्यानं या सामन्याकडे कुणी गांभीर्यानं पाहात नव्हतं. पण भारत-पाक म्हटलं की द्वंद्व हे आलंच.
सामना सुरू असताना पाकिस्तानचे जावेद मियाँदाद आणि अब्दुल कादिर लंचसाठी पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्यामुळे कर्णधार इमरान खान यांच्याकडे क्षेत्ररक्षणासाठी खेळाडूंची कमतरता भासली. त्यांनी सीसीआयकडे मदत मागितली आणि सचिन त्यावेळी सीमारेषेजवळ बसला होता.
क्षेत्ररक्षणासाठी का होईना मैदानात जाण्याची आणि खेळण्याची संधी मिळतेय हे पाहून सचिननं संधी हेरली. त्यानं खेळण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यास होकारही मिळाला. सचिन आणि आणखी एका भारतीय खेळाडूनं त्यावेळी मैदानात पाकिस्तानसाठी क्षेत्ररक्षण केलं.
सचिनने त्यावेळी जवळपास अर्धातास पाकिस्तानसाठी क्षेत्ररक्षण केलं होतं. सचिननं या घटनेचा उल्लेख त्याच्या 'प्लेइंग इट माय वे' या आत्मचरित्रामध्येही केला आहे. यात सचिननं क्षेत्ररक्षण करतेवेळी त्याला कपिल देव यांचा झेल टिपण्याची संधी देखील आली होती असं नमूद केलं आहे.
सचिन त्याच्या आत्मचरित्रात म्हणतो की, 'मी क्षेत्ररक्षणासाठी गेलो आणि काही मिनिटांतच कपिल देव यांनी एक उंच शॉट मारला. मी जवळपास १५ मीटर धावलो तरीही चेंडूपर्यंत पोहोचू शकलो नाही. मला आठवतंय की जेव्हा आम्ही संध्याकाळी घरी जात होतो तेव्हा मी माझा मित्र मार्कस कूटोसोबत बोलत होतो. मला जर त्यावेळी लाँग ऑनऐवजी मिड ऑनला उभं केलं असतं तर मी झेल टिपला असता'
सचिनला कपिल देव यांचा झेल टिपता आला नाही. पण पुढे सचिननं भारतीय संघात खेळण्याचं स्वप्न पूर्ण केलं. नोव्हेंबर १९८९ साली सचिननं पाकिस्तानविरोधातच भारतीय संघात पदार्पण केलं. त्यानंतर पुढची २४ वर्ष संपूर्ण क्रिकेट जगतानं सचिनला घडताना पाहिलं. मास्टर ब्लास्टर सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा!