Ruturaj Gaikwad च्या १७ चेंडूंत ७८ धावा! काल भारतीय संघासोबत होता अन् आज महाराष्ट्राकडून झळकावले शतक

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताने १२ वर्षांनंतर आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आणि या विजयाचा ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) हाही वाटेकरी आहे.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या वन डे मालिकेत २-१ असा विजय मिळवला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताने १२ वर्षांनंतर आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आणि या विजयाचा ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) हाही वाटेकरी आहे.

तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत ऋतुराजला केवळ एक सामना खेळण्याची संधी मिळाली आणि त्यात त्याने १९ धावा केल्या. त्यानंतर इशान किशनला संधी दिली गेली आणि यष्टिरक्षक-फलंदाजाने संधीचं सोनं करताना रांचीत ९३ धावांची खेळी केली. काल दिल्लीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने दमदार सेलिब्रेशन केलं आणि यात ऋतुराजही होता.

सेलिब्रेशन संपल्यानंतर ऋतुराज थेट पंजाबमध्ये पोहोचला अन् आज सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व सांभाळण्यासाठी पोहोचला. काल महाराष्ट्राच्या संघाला कर्नाटककडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. देवदत्त पडिक्कलने शतकी खेळी केली होती.

महाराष्ट्राच्या संघाला सावरण्यासाठी ऋतुराज आज मैदानावर उतरला आणि सर्व्हिस संघाविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले. राहुल त्रिपाठी हाही भारतीय संघासोबत होता आणि त्यानेही या सामन्यात १९ धावा केल्या. एन शेखने २४, ए काझीने १३ धावांचे योगदान दिले.

महाराष्ट्राचे अन्य फलंदाज शरणागती पत्करत असताना ऋतुराजने दमदार खेळी केली. त्याने ६५ चेंडूंत ११२ धावा केल्या. १२ चौकार व ५ षटकार खेचून केवळ १७ चेंडूंत त्याने ७८ धावांचा पाऊस पाडला. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर महाराष्ट्राने ६ बाद १८५ धावा केल्या. सर्व्हिसच्या मोहित कुमारने ३ व पुलकित नारंगने दोन विकेट्स घेतल्या.