भारतीय संघातील स्टार क्रिकेटर रोहित शर्मा याने टी-२० क्रिकेटनंतर आता कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा केली आहे.
मी कुठेही जाणार नाही, असे ठणकावून सांगत अजूनही खेळण्याची इच्छा आहे, अशी भावना व्यक्त करणाऱ्या रोहित शर्मानं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून अचानक निवृत्तीची घोषणा केली. ही गोष्ट अगदी धोनीच्या निवृत्तीची आठवण करून देणारी आहे.
रोहित आणि धोनी यांच्यातील निवृत्तीची गोष्ट ही फक्त सोशल मीडिया पोस्ट पुरती कॉमन नाही. अन्य काही गोष्टी आहेत ज्या अगदी सेम टू सेम आहेत.
धोनीनं निवृत्तीची पोस्ट ही ७ वाजून २९ मिनिटांनी शेअर केली होती. रोहित शर्मानंही ७ मे २०२५ या दिवशी बरोबर ७ वाजून २९ मिनिटांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली.
धोनीनं आपल्या कसोटी कारकिर्दीतील घरच्या मैदानातील शेवटचा सामना हा २०१३ मध्ये वानखेडेच्या मैदानात खेळला होता. रोहितनेही घरच्या मैदानातील शेवटचा कसोटी सामना हा वानखेडेच्या मैदानावर खेळलाय.
महेंद्र सिंह धोनीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना हा २०१४ मध्ये मेलबर्नच्या मैदानात खेळला. ती मॅच अनिर्णित राहिली होती.
रोहित शर्मानंही आपल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना हा मेलबर्नच्या मैदानातच खेळला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघाने हा सामना गमावला होता. या सामन्यात रोहितनं पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात ९ धावा केल्या होत्या.