टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने वनडे क्रिकेटमध्ये बुधवारी एक इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाविरूद्ध दमदार खेळ केल्याने, तो ICC वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला.
रोहित शर्मा हा वनडेत अव्वल स्थान मिळवणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला. रोहितने ३८ वर्षे १८२ दिवसांच्या वयात एकदिवसीय सामन्यांमध्ये नंबर १ रँकिंग मिळवले. त्याने व्हिव रिचर्ड्सचा विक्रम मोडला.
पण रोहित शर्माची चर्चा एका वेगळ्याच कारणासाठी झाली. IPL 2026 साठी रोहितचा मित्र अभिषेक नायर कोलकाता नाईट रायडरचा हेड कोच बनला. त्यानंतर रोहितही KKRमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले.
रोहित शर्मा जेव्हा वनडेत नंबर १ चा फलंदाज बनला, तेव्हा KKR ने ट्विट करत त्याचे अभिनंदन केले. जगातील सर्वोत्तम आणि कौतुकास पात्र असे म्हणत त्यांनी रोहितला शाबासकी दिली. तेव्हा रोहित आणि KKRची चर्चा रंगली.
अभिषेक नायर आणि रोहित शर्मा यांच्यातील नाते अतिशय घट्ट आहे. रोहितने मधल्या काळात १० किलो वजन घटवले, त्यात अभिषेक नायरनेच त्याचे ट्रेनिंग घेतले होते. त्यामुळे या चर्चांना अधिकच रंग चढला.
त्यातच भर म्हणून, कोलकाताच्या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट केली आणि विचारले की, आता आम्ही कन्फर्म समजायचे का? त्यावर KKRकडून उत्तर आले की- कन्फर्म नंबर १ बॅट्समन. त्यामुळे चर्चांना उधाण आले.
मुंबई इंडियन्सने मात्र आज या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला. मुंबई इंडियन्सने एक ट्विट केले. त्यात लिहिले की- सूर्य उद्याही उगवेल हे कन्फर्म आहे, पण 'नाईट'मध्ये नाही. कारण हे कठीणच नव्हे तर अशक्य आहे.
रोहित शर्मा २०११पासून मुंबई इंडियन्समध्ये खेळतो आहे. त्याने मुंबईला ५ वेळा विजेतेपदही मिळवून दिले आहे. पण २०२४मध्ये हार्दिक पांड्याला कर्णधार बनवल्यावर रोहित नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर आता पडदा पडला.