भारतीय संघाला २०१३ नंतर आयसीसी स्पर्धा जिंकता आलेल्या नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०२३ मध्ये हा दुष्काळ संपेल, अशी चाहत्यांना खात्री आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे.
२०११मध्ये अखेरच्या क्षणाला रोहितचे नाव १५ सदस्यीय संघातून वगळण्यात आले. त्याच वर्षी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्ड कप उंचावला. १९८३ नंतर प्रथमच भारताने वन डे वर्ल्ड कप जिंकला होता आणि त्या संघाचा सदस्य होता न आल्याची खंत रोहितने काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती. काही दिवसांपूर्वी रोहितने दावा केला होता की २०११मध्ये युवराज सिंगने त्याला कशी मदत केली होती जेव्हा त्याची वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात निवड झाली नव्हती.
“मी उदास होतो आणि माझ्या खोलीत बसलो होतो आणि पुढे काय करावे हे मला कळत नव्हते. मला आठवते की युवी (युवराज सिंग) मला त्याच्या खोलीत बोलावून जेवायला घेऊन गेला. युवराजने मला समजावून सांगितले. तो मला म्हणाला, 'सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुझ्यासमोर इतकी वर्षे आहेत. आम्ही वर्ल्ड कप खेळत असताना, तू तुझ्या खेळावर, कौशल्यावर कठोर परिश्रम करण्यासाठी आणि पुनरागमन करण्यासाठी मेहनत घे. तू भारतासाठी खेळू शकणार नाही किंवा वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळणार नाही असा कोणताही मार्ग नाही', असे रोहितने काही दिवसांपूर्वी पीटीआयला सांगितले.
१२ वर्षांनी रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. २०२१ मध्ये विराट कोहलीकडून रोहित शर्माला भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. २००८ ते २०१२ या कालावाधीत टीम इंडियाच्या निवड समितीचे सदस्य असलेल्या राजा वेंकट ( Raja Venkat) यांनी धक्कादायक खुलासा केला होता.
वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी तीन वर्ष रोहित वन डे संघाचा नियमित सदस्य होता आणि २०११ च्या वर्ल्ड कपच्या एक महिन्याआधी त्याला संघातून वगळले गेले. यावर वेंकट म्हणाले, ''जेव्हा आम्ही संघ निवडीसाठी बसलो होतो, तेव्हा रोहित हा आमच्या स्कीममध्ये होता. यशपाल शर्मा आणि मी त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत होतो, तेव्हा भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर होता. आम्ही १ ते १४ जणांची नावं निवडली अन् ती पॅनेलने मान्य केली. १५व्या क्रमांसाठी रोहितचं नाव होतं. गॅरी कर्स्टन यांनाही टीम योग्य वाटत होती, परंतु MS Dhoniला पियूष चावला संघात हवा होता. मग कर्स्टन यांनी लगेच यू टर्न मारला अन् धोनीला पाठींबा दिला. त्यानंतर रोहितचे नाव संघातून वगळले गेले.''