टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. न्यूझीलंडविरूद्ध ( IND vs NZ ) खेळताना ४ गडी आणि ६ चेंडू राखून पराभूत केले. २५२ धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने ७६ धावांची दमदार खेळी केली.
रोहित व्यतिरिक्त संपूर्ण स्पर्धेत विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शुबमन गिल या फलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली. तर वरूण चक्रवर्ती, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी गोलंदाजीत उत्तम किमया केली.
२०२४च्या टी२० वर्ल्डकप विजयानंतर भारतीय संघाचे दोन दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निवृत्ती जाहीर केली होती. तसाच काहीसा माहोल या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतरही केला जाईल, अशी चर्चा रंगली होती.
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली अन् कॅप्टन रोहित शर्माने निवृत्तीसंदर्भात रंगलेल्या चर्चेचा विषयही संपवला. निवृत्तीच्या अफवा पसरवू नका, असे म्हणत त्याने यापुढेही टीम इंडियाकडून वनडे खेळणार असल्याचे स्पष्ट केले.
संजना गणेसनला दिलेल्या मुलाखतीतही रोहित म्हणाला की, तो सध्या चांगला खेळतोय आणि निवृत्तीसारख्या गोष्टींचा विचार केलेला नाही. सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. सध्या मी क्रिकेटचा आनंद घेतोय आणि सारे सपोर्ट करत आहेत.
रोहित शर्माने सध्या निवृत्ती न घेण्यामागे एक विशेष कारण आहे असे रिकी पॉन्टींगने मत मांडले. त्याने दिलेल्या एका मुलाखतीत ते कारण सांगितले आणि त्यामागे नेमका काय विचार असेल हेदेखील स्पष्ट केले.
पॉन्टींग म्हणाला, 'रोहितने निवृत्तीच्या चर्चा ऐकल्या असतील आणि त्यावर नक्कीच विचार केला असेल. नीट विचार झाल्यावर त्याला समजले असेल की तो अजूनही उत्तम खेळतोय. त्याला संघातून सपोर्ट मिळतोय.'
'रोहित मनात म्हणाला असेल की मला संघाचं नेतृत्व करायचंय आणि २०२७चा वनडे वर्ल्डकप खेळून संघाला आणखी एक मोठी स्पर्धा जिंकवून द्यायची आहे म्हणूनच त्याने निवृत्ती घेतलेली नाही,' असे पॉन्टींग म्हणाला.