भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणाऱ्या रोहितने अनेक विक्रमांना गवसणी घातली.
वन डे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक द्विशतक (३) झळकावणारा शिलेदार म्हणून रोहितला ओळखले जाते. सर्वांचा लाडका रोहित क्रिकेट विश्वात हिटमॅन म्हणून प्रसिद्ध आहे.
रोहित सध्या आयपीएलमध्ये व्यग्र आहे. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून काढल्याने रोहितच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे. पण, हिटमॅनने चेन्नई सुपर किंग्सविरूद्धच्या सामन्यात शतकी खेळी करून आपल्या घरच्या मैदानावर चाहत्यांना खुशखबर दिली. तो सामना मुंबईने गमावला असला तरी रोहितने अखेरपर्यंत कडवी झुंज दिली.
रोहितच्या वाढदिवशी चाहत्यांपासून आजी माजी खेळाडूंपासून ते समालोचक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मुंबईच्या शिलेदारांनी धुमधडाक्यात आपल्या माजी कर्णधाराचा वाढदिवस साजरा केला.
रोहितच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये रोहित त्याची पत्नी रितीका सजदेह, सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी दिसत आहे.
रोहितने पत्नीला जादू की झप्पी मारल्याचे पाहायला मिळाले. रितीका सजदेहने एक खास पोस्ट करून आपल्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने काही फोटो देखील शेअर केले आहेत.
रितीकाने शुभेच्छा देताना म्हटले की, माझ्या सर्वात आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...हे वर्ष आनंदात जावो. तुझी सगळी स्वप्ने सत्यात उतरोत, या खास दिवसाच्या शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम.
रोहित शर्मा आणि रितीका सजदेह हे एका मुलीचे पालक आहेत. समायरा असे रोहितच्या लेकीचे नाव आहे. रोहितने ४७२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून १४,८२० धावा केल्या आहेत. यामध्ये ४८ शतकांचा समावेश आहे.