राहुल द्रविडच टीम इंडियाचा 'हेडमास्तर', जाणून घ्या वर्षाला किती मिळतो पगार?

BCCI ने राहुल द्रविडच्या मुख्य प्रशिक्षकपदाला दिली मुदतवाढ

Rahul Dravid Salary : टीम इंडियाला वन डे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले. त्यानंतर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक पदावरून पायउतार होणार अशी चर्चा रंगली होती. या चर्चांना अखेर काल पूर्णविराम मिळाला.

राहुल द्रविडला भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी BCCI कडून मुदतवाढ देण्यात आली. आता भारतीय संघाचे पुढील लक्ष्य 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरणे हे असेल.

या दरम्यान सध्या राहुल द्रविड आता आणखी किती काळ या पदावर राहणार? त्याचे मानधन किती असेल अशा विविध चर्चा रंगल्याचे दिसते आहे. याबद्दल जाणून घेऊया.

भारतीय क्रिकेट बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे की, 'मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि टीम इंडियाच्या (सिनियर मेन्स टीम) सपोर्ट स्टाफच्या कराराच्या विस्ताराची आम्ही घोषणा करत आहोत. विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर बोर्डाने त्याच्याशी चर्चा केली आणि त्याचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.'

द्रविडचा कार्यकाळ किती असेल याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी जून-जुलैमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकापर्यंत तो या पदावर राहणार असल्याचे समजते.

अधिकृतरित्या ठरवण्यात आलेल्या मानधनाच्या आराखड्याप्रमाणे (According to the official pay grade) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी असलेल्या द्रविड यांना वर्षाला १२ कोटींचे मानधन मिळते. याआधी असलेल्या रवी शास्त्रींना वार्षिक ९.५० कोटींचे मानधन मिळत असल्याचेही सांगितले जात आहे.