T20 World Cup, India vs Bangladesh : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बुधवारी बांगलादेशवर थरारक विजयाची नोंद केली. भारताने हा विजय मिळवून ६ गुणांसह ग्रुप २ मध्ये अव्वल स्थान पटकावले आणि आता दुसऱ्या स्थानासाठी दक्षिण आफ्रिका व बांगलादेश शर्यतीत आहे. पाकिस्तानचे आव्हान जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे.
ग्रुप २ मधील आजचा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा होता आणि पावसाच्या आगमनाने भारताचे गणित बिघडवले होते. पावसामुळे सामना रद्द झाला असता तर बांगलादेशचा DLS विजय निश्चित होता, परंतु पाऊस थांबला अन् भारताने रोमहर्षक विजयाची नोंद केली.
लोकेश राहुल व विराट कोहली या दोघांनी भारतीय संघाला तारले. लोकेश ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार खेचून ५० धावांवर बाद झाला. विराटसह त्याने ६७ धावांची भागीदारी केली. विराट ४४ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६४ धावांवर नाबाद राहिला. सूर्यकुमार यादव १६ चेंडूंत ३० धावा ( ४ चौकार) करून माघारी परतला. आर अश्विनने ६ चेंडूंत १३ धावा कुटल्या. भारताने ६ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला.
भारताच्या १८४ धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशने तुफानी खेळी केली. लिटन दास व नजमूल शांतो यांनी बांगलादेशला दमदार सुरुवात करून देताना ७.१ षटकांत ६८ धावांची भागीदारी केली. पावसाचा व्यत्यय आला तेव्हा DLS ( डकवर्थ लुईस नियम) नुसार बांगलादेश १७ धावांनी आघाडीवर होता आणि सामना रद्द झाला असता त्यांना विजयी घोषित केले गेले असते.
पाऊस थांबला आणि बांगलादेशसमोर १६ षटकांत १५१ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले. सुधारित लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन मैदानावर उतरलेल्या बांगलादेशला दुसऱ्याच षटकात धक्का बसला. लोकेश राहुलच्या डायरेक्ट हिटने भारताला मोठी विकेट मिळवून दिली. २७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा करणारा लिटन दास रन आऊट झाला.
मोहम्मद शमीने टाकलेल्या १०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नजमूल शांतोने खणखणीत फटका मारला, परंतु सूर्यकुमारने सुरेख झेल टिपला. शांते २१ धावांवर बाद झाल्याने बांगलादेशची अवस्था २ बाद ८४ झाली. त्यानंतर अर्शदीप सिंग व हार्दिक पांड्या यांनी त्यांच्या एकेका षटकात प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. बांगलादेशला १८ चेंडूंत ४३ धावांची गरज होती.
२०१६च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच असाच थरार पाहायला मिळाला होता आणि तेव्हा महेंद्रसिंग धोनीने चतुराईने रन आऊट करून भारताचा विजय पक्का केला होता. बांगलादेशला ६ चेंडूंत २० धावा करायच्या होत्या. अर्शदीपच्या पहिल्या चेंडूवर १ धाव दिली आणि नुरूल हसन स्ट्राईकवर आला. पुढच्याच चेंडूवर हसनने षटकार खेचला. त्यानंतर दोन चेंडूंत दोन धावा दिल्या.
आता २ चेंडू ११ धावा बांगलादेशला हव्या होत्या आणि अर्शदीपने चौकार दिला. १ चेंडू ७ धावा असा सामना थरारक झाला. अर्शदीपने शेवटच्या चेंडूवर १ धाव दिली आणि भारताने ५ धावांनी ( DLS) सामना जिंकला. भारत ६ गुण व +०.७३० गुणांसह ग्रुप २ मध्ये आघाडीवर आहे. भारताचा अखेरचा सामना झिम्बाब्वेसोबत आहे.
दक्षिण आफ्रिका ३ सामन्यांत ५ गुणांची कमाई करून दुसऱ्या स्थानावर आहेत आणि त्यांच्यासमोर पाकिस्तान व नेदरलँड्सचे आव्हान आहे. यापैकी एक सामना जिंकून ते उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करू शकतील. पाकिस्तान ( २), बांगलादेश ( १) यांच्या लढती काही अंशी गुणतालिकेत बदल करू शकतील.
पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले असले तरी ते आता भारताला रोखण्यासाठी रडीचा डाव खेळू शकतील. पाकिस्तानच्या दोन लढती शिल्लक आहेत आणि त्यांना दक्षिण आफ्रिका व बांगलादेशचा सामना करायचा आहे. अशात ते आफ्रिकेला नमवून आणि बांगलादेशसोबत पराभूत होऊन भारताला रोखू शकतील.
आफ्रिकेला दोन लढतीत नेदरलँड्स व पाकिस्तानचा सामना करायचा आहे. आफ्रिकेने नेदरलँड्सला पराभूत केल्यास त्यांचे ७ गुण होती आणि ते उपांत्य फेरीत जातील, परंतु भारत दुसऱ्या क्रमांकावर येईल. झिम्बाब्वेकडून भारताचा पराभूत झाल्यास. पाकिस्तान संधी साधेल. अशा परिस्थितीत पाकिस्तान आफ्रिकेला नमवण्याचा प्रयत्न तर करेलच. पण बांगलादेशकडून दारूण पराभव पत्करून भारताचा मार्ग रोखू शकतील.
बांगलादेशने पाकिस्तानला नमवल्यास त्यांचे ६ गुण होतील आणि सरस नेट रन रेट भारत व बांगलादेश यांच्यापैकी एकाला सेमीत संधीम मिळेल.