रविवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक मोठी घोषणा करत वन डे आणि ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदी पुन्हा एकदा बाबर आझमच्या नावाची घोषणा केली. ट्वेंटी-२० विश्वचषकाला अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी उरला असून यासाठी पाकिस्तानी खेळाडू तयारीला लागले आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या फिटनेससाठी विशेष योजना आखली आहे. शेजारील देशातील खेळाडू लष्कराच्या जवानांसोबत प्रशिक्षणाचे धडे घेत आहेत. बाबरसह पाकिस्तानचे २७ खेळाडू काकुल, अबोटाबाद येथील फिटनेस शिबिरात सहभागी झाले.
अलीकडेच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आणि अष्टपैलू इमाद वसिम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतले आहेत. त्यांनी राजीनामा परत देत पाकिस्तानसाठी उपलब्ध असल्याचे जाहीर केले.
इमाद आणि आमिर दोघेही अबोटाबाद येथील फिटनेस शिबिराचा भाग आहेत. बाबर आझमवर सातत्याने टीका करणारी ही जोडी आता बाबरच्याच नेतृत्वात खेळताना दिसणार आहे.
आमिर म्हणाला की, पाकिस्तानी लष्कराकडून मिळत असलेले प्रशिक्षण कठीण असले तरी ते फायदेशीर आहे. या प्रशिक्षणामुळे खेळाडूंची क्षमता वाढण्यास मदत होईल. यामुळे नक्कीच ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ साठी संघ अधिक मजबूत होईल.
वेगवान गोलंदाज हारिस रौफने देखील या प्रशिक्षणावरून पीसीबीचे आभार मानले. त्याने सांगितले की, लष्कराच्या जवानांसोबत प्रशिक्षण घ्यायचे हे माझे स्वप्न सत्यात उतरले आहे. मी पुढच्या तीन ते चार आठवड्यात गोलंदाजी करू शकेन आणि मी ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ साठी तयार आहे.
पाकिस्तान संघाच्या खेळाडूंनी आर्मी स्कूल ऑफ फिजिकल ट्रेनिंगमध्ये प्रशिक्षण घेतले. यावेळी खेळाडूंचा धावण्याचा सराव घेण्यात आला. २९ खेळाडू या सराव सत्रात सहभागी झाले असल्याची माहिती बोर्डाने दिली.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले की, पाकिस्तान लष्कराच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. आगामी काळात होणारा ट्वेंटी-२० विश्वचषक, न्यूझीलंडविरूद्धची ट्वेंटी-२० मालिका, आयर्लंड आणि इंग्लंडविरूद्धची ट्वेंटी-२० मालिका यासाठी पाकिस्तानी संघातील खेळाडूंची फिटनेस चाचणी घेण्यात आली.
भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचषकात शेजाऱ्यांनी निराशाजनक कामगिरी केली. अफगाणिस्तानसारख्या संघाकडून देखील पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता.