पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडू नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. शेजारील देशातील वेगवान गोलंदाज हारिस रौफ त्याच्या तापट स्वभावासाठी ओळखला जातो.
ट्वेंटी-२० विश्वचषकात विराट कोहलीने पाकिस्तानच्या हारिस रौफला मोक्याच्या क्षणी सलग दोन षटकार मारले अन् पाकिस्तानी गोलंदाज प्रसिद्धीच्या झोतात आला. वेगवान गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रौफची आता सर्वत्र धुलाई होत असल्याचे दिसते.
तेव्हाच्या विश्वचषकानंतर, आशिया चषक, वन डे विश्वचषक २०२३ आणि ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्येही हारिसची बेक्कार धुलाई झाली. हारिस सध्या अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट खेळत आहे.
क्रिकेपटूंबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगत असते. अनेकदा काही अफवा पसरवल्या जातात. अशीच एक अफवा हारिस रौफच्या बाबतीत पसरवण्यात आली. अखेर खुद्द हारिसने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल स्पष्टीकरण दिले.
दरम्यान, एक अफवा पसरवली जात आहे की, हारिस रौफ बाप झाला असून त्याची पत्नी मुझनाने मुलाला जन्म दिला आहे. ही बातमी संपूर्ण पाकिस्तानात पसरली. हे हारिसच्या लक्षात येताच त्याने मौन सोडले.
आपण आई होणार असल्याची बातमी हारिसच्या पत्नीला समजताच तिनेही संताप व्यक्त केला. हारिस रौफला याची माहिती मिळताच त्याने लगेचच सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले.
हारिस रौफने पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, मला मुलगा झाला असल्याची खोटी बातमी पसरवली जात आहे. अशा खोट्या बातम्यांपासून दूर राहावे ही विनंती. माझ्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणतीही माहिती जी कोणत्याही अनधिकृत अकाउंटमार्फत प्राप्त झाली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे.
हारिस रौफने २०२३ मध्ये त्याची मैत्रीण मुझना मसूदशी लग्न केले. दोघांचे लग्न होऊन दोन वर्षे झाली आहेत.
मुझना आणि हारिस रौफ यांनी एकत्र शिक्षण घेतले. तिथूनच त्यांच्यात मैत्री झाली मग प्रेम... आणि बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.