पाकिस्तानी संघाचा स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी शुक्रवारी विवाहबंधनात अडकला आहे. अलीकडेच पाकिस्तानी संघाने मायदेशात इंग्लंडविरूद्ध आणि न्यूझीलंडविरूद्ध मालिका खेळली. मात्र, दुखापतीमुळे शाहीन आफ्रिदी मालिकेत सहभागी होऊ शकला नव्हता.
मात्र, 22 वर्षीय शाहीन आफ्रिदी लग्नानंतर दुखावला आहे. शाहीनचे म्हणणे आहे की लोकांनी त्याच्या गोपनीयतेचा आदर केला नाही. यावरूनच जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या शाहीनने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
लग्नानंतर शाहीन आफ्रिदीचे त्याची बायको अंशासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. शाहीनला हीच गोष्ट खटकली आणि त्याने सोशल मीडियावरून लोकांना खास आवाहन केले.
शाहीनने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, 'हे खूप निराशाजनक आहे की वारंवार विनंती करूनही आमच्या गोपनीयतेचे उल्लंघन केले गेले आणि लोक विचार न करता ते शेअर करत राहिले. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नम्रपणे विनंती करतो की कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा आणि आमचा अविस्मरणीय दिवस खराब करण्याचा प्रयत्न करू नका.'
खरं तर शाहीनच्या लग्नाचे फोटो लीक कोणी केले? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, आता शाहीनने ट्विटच्या माध्यमातून गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.
शाहीनने लग्नानंतर ट्विटरवर तीन फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये पत्नीचा चेहरा दिसत नाही. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, 'देव दयाळू आहे. शुभेच्छांबद्दल आणि आमचा खास दिवस संस्मरणीय बनवल्याबद्दल सर्वांचे आभार.'
शाहीनच्या लग्नात सर्व नातेवाईकांना फोन बंद ठेवण्याची विनंती करण्यात आली होती. एंट्री गेटवर जारी केलेल्या सूचना सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गेटवरील सूचनांमध्ये लिहिले होते की, तुम्ही लोक आज आम्हाला देऊ शकणारी सर्वात मोठी भेट म्हणजे कृपया तुमचे फोन बंद करा आणि आमच्यासोबत या खास क्षणाचा आनंद घ्या.
पाकिस्तानातील प्रमुख शहर असलेल्या कराचीतील मशिदीत हा विवाहसोहळा पार पडला. अंशा ही आफ्रिदीची मोठी मुलगी आहे. शाहीनची बायको अंशा अनेकदा सामना पाहताना जगासमोर आली आहे.
शाहिद आफ्रिदीने याबाबत माहिती देताना म्हटले होते, 'माझी मुलगी अंशा आणि 22 वर्षीय वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आमच्या परंपरेनुसार लग्न करणार आहेत. हा सोहळा कराचीमध्ये होणार होईल. लग्नानंतर शाहीन पाकिस्तान सुपर लीगच्या आगामी हंगामात सहभागी होणार आहे. तो पीएसएलमधील लाहोर कलंदर संघाचा एक भाग आहे.'