इंग्लंडचा संघ तब्बल 17 वर्षांनंतर पाकिस्तानच्या धरतीवर कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लिश संघाने यजमानांचा धुव्वा उडवून विजयी सलामी दिली. रोमहर्षक झालेल्या या सामन्यात अखेर इंग्लिश गोलंदाजांनी डाव साधला आणि विजय मिळवला. या पराभवानंतर भाष्य करताना पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांनी कसोटी क्रिकेटच्या भविष्याबद्दल भाष्य केले.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा यांनी वनडे विश्वचषक 2023 साठी पाकिस्तान भारतात येणार नसल्याच्या त्यांच्या वक्तव्यावर यू-टर्न घेतला आहे. तर रमीझ राजा यांनी म्हटले की, मला खात्री नाही पाकिस्तानी संघ आयसीसी इव्हेंटसाठी देशाची सीमा ओलांडेल की नाही. लक्षणीय बाब म्हणजे राजा यांनी मेन इन ब्लूला पाकिस्तानविरुद्ध कसोटी खेळण्यासाठी आमंत्रित केले आहे.
2023 च्या वनडे विश्वचषकातून पाकिस्तान माघार घेण्याबद्दलच्या आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना राजा म्हणाले की, आशिया चषकाची स्पर्धा तटस्ठ ठिकाणी खेळवण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) काय म्हटले आहे यावर ती प्रतिक्रिया होती. पीसीबी अध्यक्षांनी भारतीय क्रिकेट बोर्डाला राजकारण बाजूला ठेवण्याचे आवाहन केले आणि भारतीय संघाला पाकिस्तानात जाऊन द्यावे असा सल्ला देखील दिला.
पाकिस्तानी संघाचे माजी कर्णधार राजा यांनी कसोटी फॉरमॅटच्या दीर्घायुष्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा कसोटी क्रिकेट व्हायला हवे असे म्हटले. 'कसोटी क्रिकेटला भारत विरूद्ध पाकिस्तान अशा सामन्यांची गरज आहे', असे म्हणत राजा यांनी वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
तसेच आयसीसीबद्दल निराशा व्यक्त करताना रझा यांनी दोन्ही राष्ट्रांमधील राजकीय तणाव असूनही फिफा विश्वचषक स्पर्धेत अमेरिका आणि इराण खेळत असल्याचे उदाहरण दिले. खरं तर सध्या कतारच्या धरतीवर फिफा विश्वचषकाचा थरार रंगला आहे. या स्पर्धेत अमेरिका आणि इराण हे संघ देखील खेळत आहेत. याचाच दाखला देत राजा यांनी आयसीसीला सुनावले.
'जर पाकिस्तान सरकारने पाकिस्तानी संघाला सुरक्षेच्या कारणावरून भारतात जाण्यास रोखले तर काय होईल? हा इथे खूप भावनिक विषय आहे. यावरून एक प्रकारे बीसीसीआयने वाद सुरू केला होता त्यामुळेच आम्हाला प्रतिसाद द्यावा लागला. कसोटी क्रिकेटला भारत विरुद्ध पाकिस्तानची गरज आहे.' असे रमीझ राजा यांनी बीबीसीच्या टेस्ट मॅच स्पेशलवर बोलताना म्हटले.
ट्वेंटी-20 विश्वचषकाबद्दल बोलताना राजा यांनी सांगितले, 'आपण सर्वांनी पाहिले आहे की विश्वचषकात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरूद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी 90,000 प्रेक्षकांची उपस्थिती होती. मी आयसीसीबद्दल थोडासा निराश आहे.' एकूणच भारत आणि पाकिस्तानच्या मुद्द्यांवर आयसीसी हस्तक्षेप करत नसल्याचे राजा यांनी म्हटले.
'अमेरिका इराणशी का खेळत आहे, इराणकडे महिलांच्या हक्कांबाबत इतके प्रश्न आहेत, असा मुद्दा फिफा अध्यक्षांकडे मांडला असता. पण खेळाच्या माध्यमातून आपण समाजाची मानसिकता जपू शकतो. मला वाटते की बॅट आणि बॉलने उत्तर द्यायला हवे', असे त्यांनी आणखी म्हटले.
दरम्यान, आगामी 2023च्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे असणार आहे. मात्र याआधीच बीसीसीआय सचिव आणि आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शाह यांनी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आणि आशिया चषकाची स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्याची मागणी केली.
भारतीय संघ सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानच्या धरतीवर जाऊ शकत नाही अशी बीसीसीआयची भूमिका आहे. मात्र बीसीसीआयने घेतलेल्या या भूमिकेवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देखील लांबलचक पत्रक काढून सडकून टीका केली होती. याशिवाय पाकिस्तानी संघ आगामी भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकावर बहिष्कार टाकेल अशी धमकी देखील पीसीबीने दिली होती.
पीसीसीबीने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर आता रमीझ राजा यांनी मवाळ भूमिका घेतली आहे. कसोटी क्रिकेट वाचवण्यासाठी भारत विरूद्ध पाकिस्तान असा खेळ व्हायला हवा असे राजा यांनी म्हटले. याशिवाय खेळाच्या माध्यमातूनच आपण समाजाची मानसिकता जपू शकतो, अशा शब्दांत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी बीसीसीआयच्या भूमिकेवर भाष्य केले.