पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

Pakistan T20 World Cup Squad 2024 : पाकिस्तानने अखेर ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे.

सगळ्यात शेवटी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला. बाबर आझमच्या नेतृत्वात पुन्हा एकदा पाकिस्तान मोठ्या व्यासपीठावर खेळत आहे. विश्वचषकाचा संघ जाहीर करण्यासाठी पाकिस्तानने एवढा विलंब का केला असावा याची चर्चा सुरू आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी विश्वचषक संघाचा भाग आहे. पण, त्याने विश्वचषकात उप कर्णधारपद सांभाळण्यास नकार दिला असल्याचे पाकिस्तानी मीडिया सांगत आहे.

आफ्रिदीला केवळ एकाच मालिकेत कर्णधारपद सांभाळण्याची संधी मिळाली. मग बाबरला पुन्हा कर्णधार बनवण्यात आले. त्यामुळे शाहीन आफ्रिदी नाराज असल्याची चर्चा होती.

पाकिस्तानने जाहीर केलेल्या विश्वचषकाच्या संघात ना राखीव खेळाडू ना उप कर्णधार आहे. त्यामुळे उप कर्णधारपदाच्या जागेवरून वाद असल्याचे स्पष्ट होते.

मोहम्मद रिझवान कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार आहे, त्याच्या पाठोपाठ शादाब खान देखील या शर्यतीत आहे. पण, शाहीनला कर्णधारपदावरून काढल्यामुळे तो उप कर्णधार होऊ शकतो असा तर्क लावला जात होता.

दरम्यान, वाद चिघळू नये यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सावध पवित्रा घेत उप कर्णधार न बनवणेच पसंत केले. विशेष बाब म्हणजे आफ्रिदीनेच उप कर्णधारपदासाठी विरोध दर्शवला असल्याचे शाहीनने 'जिओ न्यूज'शी बोलताना स्पष्ट केले.

युनूस खानच्या नेतृत्वाखाली २००९ मध्ये पाकिस्तानने वर्ल्ड कप जिंकला होता. शोएब मलिक (२००७) आणि बाबर आझम (२०२२) यांच्या नेतृत्वाखाली संघाने अंतिम फेरी गाठली होती.

बाबर आझम (कर्णधार), अब्रार अहमद, आजम खान, फखर जमान, हॅरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सईम आयुब, शाबाद खान, शाहिन शाह आफ्रिदी, उस्मान खान.