पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने झुंजार कामगिरी करत संघाचा पराभव वाचवला. १९६ धावांची दमदार खेळी करत त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा घाम काढला. त्यामुळे साहजिकच बाबर आझमच्या या खेळीचा सर्वांनी उदो उदो केला.
बाबर आझम हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो, यात दुमत नाही. पण इंग्लंडच्या माजी कर्णधाराने केलेल्या एका ट्वीटमुळे एका नव्या वादाला तोंड फुटलं.
पाकिस्तानच्या संघाला ऑस्ट्रेलियाने ५०६ धावांचे अवाढव्य लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बाबरचं पहिलंवहिलं द्विशतक अवघ्या चार धावांनी हुकलं. पण त्याने जी झुंजारवृत्ती दाखवली, त्याचं ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही कौतुक केलं.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकन वॉन हा सातत्याने भारतीय खेळाडूंवर टीकास्त्र सोडत असतो. त्याने बाबर आझमचं कौतुक अशा प्रकारे केलं की त्यामुळे नवा वाद सुरू झाला.
'बाबर आझम हा आताच्या घडीला क्रिकेटमधील सगळ्या फॉरमॅटमध्ये जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे, हे नक्की', असं मायकल वॉन म्हणाला. तिन्ही फॉरमॅटचा वॉनने उल्लेख केल्याने तो रोहित आणि विराटपेक्षाही भारी आहे का? असा मुद्दा चर्चेत आला. आणि नवा वाद सुरू झाला.
काही नेटकऱ्यांनी असाही मुद्दा मांडला की लाहोरचं पिच हे अक्षरश: रस्त्यासारखं सपाट आहे असा दावा पाकिस्तानी खेळाडूच करत होते. त्यामुळे अशा पिचवर धावा करणं हे बाबर आझम सारख्या खेळाडूसाठी काहीच कठीण नाही.