दुष्काळात तेरावा महिना! न्यूझीलंडचे आणखी २ खेळाडू बाहेर; यजमान पाकिस्तानची फजिती

PAK vs NZ T20: १८ एप्रिलपासून पाकिस्तान मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे.

पाकिस्तानी संघ ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या तयारीला लागला आहे. १८ एप्रिलपासून पाकिस्तानच्या धरतीवर न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका दोन्हीही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

येत्या जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. भारतात आयपीएल सुरू असल्याने किवी संघातील वरिष्ठ खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्याकडे कानाडोळा केला.

न्यूझीलंडचा संघ आधीच जाहीर झाला होता, तर मंगळवारी पाकिस्तानी संघाची घोषणा करण्यात आली. फिक्सिंगमुळे बंदी घालण्यात आलेला मोहम्मद आमिर आगामी मालिकेत दिसणार आहे.

भारतात सध्या आयपीएल खेळवली जात आहे, यामुळे पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे. कारण न्यूझीलंडच्या वरिष्ठ खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्याकडे पाठ फिरवली असून आयपीएलला प्राधान्य दिले आहे.

न्यूझीलंडचा दुय्यम संघ पाकिस्तानचा दौरा करेल. मिचेल सँटनर, डॅरिल मिचेल, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, ट्रेन्ट बोल्ट, ग्लेन फिलिप्स आणि लॉकी फर्ग्युसन या शिलेदारांनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे.

मालिकेला एका आठवड्याचा कालावधी उरला असताना किवी संघातील आणखी दोन खेळाडू मालिकेतून बाहेर झाले आहेत. फिन अलेन आणि ॲडम मिल्ने दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाले. त्यांच्या जागी टॉम ब्लंडेल आणि झॅक फॉल्क्स यांना संधी मिळाली आहे.

न्यूझीलंडचे आणखी दोन खेळाडू स्पर्धेबाहेर झाल्याने पाकिस्तानला देखील मोठा फटका बसला आहे. कारण आधीच नवखा संघ त्यात आणखी नव्या चेहऱ्यांची भर पडली आहे. किवी संघ हलका असला तरी यजमान पाकिस्तानने तगडा संघ उतरवला आहे.

बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर झमान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद रिझवान, मोहम्मद आमिर, मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, सैम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उसामा मीर, उस्मान खान, झमान खान,

मायकेल ब्रेसव्हेल (कर्णधार), मार्क चॅपमन, जोश क्लार्कसन, टॉम ब्लंडेल, झॅक फॉल्क्स, जॅकोब डफी, डिन फॉक्सक्रॉफ्ट, बेन लिस्टर, Cole McConchie, जिमी नीशम, Will O’Rourke, टीम रॉबिन्सन, बेन सर्स, टीम सेफर्ट, इश सोधी.

पुढीलप्रमाणे सामने खेळवले जातील - १८ एप्रिल - रावळपिंडी (१), २० एप्रिल - रावळपिंडी (२), २१ एप्रिल - रावळपिंडी (३), २५ एप्रिल - लाहोर (४) आणि २७ एप्रिल - लाहोर (५).