बाबर आजम- Iftikhar Ahmed यांची रेकॉर्ड ब्रेकिंग आतषबाजी; विराटसह अनेकांच्या विक्रमाची ऐशी तैशी!

PAK vs NEP Asia Cup 2023 Live Marathi : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम आणि इफ्तिखार अहमद यांनी आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात धुमाकुळ घातला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी २१४ धावांची भागीदारी करून अनेक विक्रम मोडले.

बाबर १३१ चेंडूंत १४ चौकार व २ षटकारांसह १५१ धावांवर झेलबाद झाला. इफ्तिखार ७१ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांसह १०९ धावांवर नाबाद राहिला अन् पाकिस्तानने ६ बाद ३४२ धावा चोपल्या. शेवटच्या १० षटकांत या दोघांनी १२९ धावा चोपल्या. नेपाळच्या सोमपाल कामीने ८५ धावा देत २ विकेट्स घेतल्या.

आशिया चषक ( वन डे) बाबर आजम व इफ्तिखार अहमद यांची २१४ धावांची भागीदारी ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. त्यांनी विराट कोहली व अजिंक्य रहाणे ( २०१४) यांचा २१३ धावांचा आणि रोहित शर्मा व शिखर धवन ( २०१८) यांचा २१० धावांचा विक्रम मोडला. पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिज व नासीर जमशेद यांनी २०१२ मध्ये २२४ धावांची भागीदारी केली होती, त्यापाठोपाठ शोएब मलिक व युनूस खान ( २२३) यांचा क्रमांक येतो.

पाकिस्तानच्या घरच्या मैदानावरील बाबर-इफ्तिखार यांची भागीदारी सर्वोत्तम ठरली. यापूर्वी १९८२मध्ये मोहसिन-झहीर अब्बास यांनी भारताविरुद्ध मुल्तान येथे २०५ धावा जोडल्या होत्या. १९९२ मध्ये रावळपिंडी येथे श्रीलंकेविरुद्ध इंझमान उल हक- शोएब मलिक यांनी २०४ धावांची भागीदारी केलेली.

बाबर-इफ्तिखार यांनी पाचव्या विकेटसाठी आज १३१ धावा जोडल्या अन् पाकिस्तानकडून वन डे क्रिकेटमधील ही पाचव्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली. २००९ मध्ये उमर अकमल व युनिस खान यांनी श्रीलंकेविरुद्ध १७६ धावा जोडलेल्या.

आशिया चषक स्पर्धेत सर्वोत्तम वैयक्तिक कर्णधाराच्या धावसंख्येचा विक्रम बाबरच्या ( १५१) नावावर नोंदवला गेला. त्याने विराट कोहलीचा १३६ धावांचा ( वि. बांगलादेश, २०१४) आणि सौरव गांगुलीचा १३५* धावांचा ( वि. बांगलादेश, २०००) विक्रम मोडला.