इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे... मागील दौऱ्यावर जेवणातून इंग्लंडच्या खेळाडूंना बाधा झाली होती आणि त्यामुळे यंदा इंग्लिश संघ स्वतःचा आचारी घेऊन आले आहेत. तरीही पहिल्या कसोटीपूर्वी १२ खेळाडूंना व्हायरसने त्रास दिला. आजारी असूनही इंग्लंडचे खेळाडू मैदानावर उतरले अन् पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली. इंग्लंडच्या फलंदाजांनी विक्रमांवर विक्रम केले आणि आता पाकिस्तानी चाहते बाबर आजम अँड टीमचे वाभाडे काढताना दिसत आहेत.
झॅक क्रॅवली ( १२२), बेन डकेट ( १०७), ऑली पोप ( १०८) आणि हॅरी ब्रुक ( १५३) यांनी कसोटीच्या पहिल्याच दिवशी शतक झळकावताना ५००+ धावा केल्या. कसोटीच्या पहिल्या दिवशी चार शतकं व ५००+ धावा करणारा इंग्लंड हा कसोटी इतिहासातील पहिला संघ ठरला.
क्रॅवली व डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी केलेली २३३ धावांची भागीदारी हाही एक वर्ल्ड रेकॉर्ड ठरला आणि इंग्लंडने पहिल्या डावात ६५७ धावा केल्या. पाकिस्तानच्या जाहीद महमूदने ४, तर नसीम शाहने ३ विकेट्स घेतल्या.
पाकिस्तानचे ओपनर अब्दुल्लाह शफिक ( ११४) व इमाम-उल-हक ( १२१) यांनी पहिल्या विकेटसाठी २२५ धावांची भागादारी केली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दोन्ही संघांच्या ओपनर्सनी द्विशतकी भागीदारी करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
कर्णधार बाबर आजमनेही १३६ धावांची खेळी केली. रावळपिंडी कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांत ७ शतकं झळकावली गेली आणि आता खेळपट्टीवरून संताप व्यक्त केला जातोय.. त्यावरून आणि खाण्यावरून पाकिस्तानी चाहतेही संघाची फिरकी घेत आहेत.