भारत वर्ल्ड कप २०२३ नाही जिंकणार! गौतम गंभीरने दुसऱ्याच संघाचं घेतलं नाव

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १० वर्षांचा आयसीसी स्पर्धांचा दुष्काळ संपवणार, असा अनेकांना विश्वास आहे, परंतु भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याचे मत काही वेगळे आहे.

भारतात होणारा वन डे वर्ल्ड कप कोण जिंकणार? या प्रश्नाचं उत्तर अनेकांच्या तोंडून एकच येतंय आणि ते म्हणजे टीम इंडिया... रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १० वर्षांचा आयसीसी स्पर्धांचा दुष्काळ संपवणार, असा अनेकांना विश्वास आहे, परंतु भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याचे मत काही वेगळे आहे.

५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत भारतात वन डे वर्ल्ड कप होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि गतउपविजेत्या न्यूझीलंड यांच्या लढतीने वर्ल्ड कपची सुरुवात होणार आहे. देशातील १० वेगवेगळ्या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने खेळवले जातील आणि टीम इंडिया सर्वाधिक प्रवास करत ९ शहरांमध्ये मॅच खेळणार आहे.

मागील काही महिन्यांपासून वर्ल्ड कप स्पर्धेता विजेता कोण असेल याची चर्चा रंगलीय आणि इयॉन मॉर्गन, ग्लेन मॅकग्राथ व एबी डिव्हिलियर्स या दिग्गजांनी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ सेमीफायनलमध्ये धडक मारतील असा दावा केलाय. एबीने तर फायनल इंग्लंड आणि भारत यांच्यात होईल असेही म्हटले.

पण, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ज्याने २०११च्या वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या, त्याने यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया सोडून दुसऱ्याच संघाचे नाव जेतेपदासाठी घेतले. बडा भारत शो सीझन २ मध्ये गौतम गंभीरने रॅपिड फायर राऊंडमध्ये हे मत व्यक्त केले.

गौतम गंभीरने भारत व इंग्लंड या दोन्ही संघांना जेतेपदाच्या शर्यतीतून हटवले अन् ऑस्ट्रेलियाचे नाव घेतले. त्याच्यामते पाच वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचे यंदाही जेतेपद पटकावण्याचा चान्स अधिक आहे.

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड कप स्पर्धेत उतरणार आहे. भारतीय खेळपट्टीचा अंदाज घेत ऑस्टेलियाने त्यांच्या संघात अष्टपैलू खेळाडूंची निवड केलेली आहे. ८ ऑक्टोबरला भारताविरुद्ध चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर ते वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करतील.