ना रोहित, ना कोहली, ना शमी! गौतम गंभीरने म्हणतो, फायनलमध्ये 'हा' खेळाडू ठरेल 'गेम चेंजर'!

ICC ODI World Cup 2023 - भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये मोठ्या तोऱ्यात एन्ट्री मारली... १९ नोव्हेंबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात महामुकाबला होणार आहे.

भारतीय संघाच्या या वाटचालीत रोहित शर्मा, विराट कोहली व मोहम्मद शमी यांचा मोठा वाटा असला तरी माजी सलामीवीर गौतम गंभीर याच्या दृष्टीने खरा गेम चेंजर दुसराच खेळाडू आहे.

टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूने या वर्ल्ड कप स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे, त्यामुळे फक्त एकाची निवड करणे खूप कठीण आहे. पण माजी सलामीवीर गौतम गंभीरने एका खेळाडूला खरा गेम चेंजर म्हणून निवडले आहे. भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत १० सामन्यांत अपराजित मालिका कायम राखली आहे.

भारतीय संघाने सलग ९ सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आणि उपांत्य फेरीत त्यांनी न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमनच्या आक्रमक सलामीच्या भागीदारीनंतर विराट कोहलीही आघाडीवर दिसत आहे. मधल्या फळीतील श्रेयस अय्यर आणि केएल राहुलची फलंदाजी जबरदस्त आहे. यानंतर मोहम्मद शमीही आपल्या शानदार गोलंदाजीने कहर करत आहे.

पण, गौतम गंभीरच्या मते या वर्ल्ड कप स्पर्धेत खरा गेम चेंजर श्रेयस अय्यर आहे. गंभीरने वर्ल्ड कप फायनलपूर्वी स्टार स्पोर्ट्स शोमध्ये आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, “हे बघ मी काहीतरी मोठे बोलणार आहे. विराट कोहलीने चांगली खेळी केली आहे, पण माझ्यासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याचा खरा गेम चेंजर श्रेयार अय्यर आहे. पहिला वर्ल्ड कप खेळणाऱ्या या खेळाडूने किती शानदार फलंदाजी केली. त्याने सलग दोन शतके झळकावली आहेत आणि अंतिम फेरीतही तो खरा गेम चेंजर ठरू शकतो.”

गंभीर पुढे म्हणाला, “ या वर्ल्ड कपच्या सुरुवातीला श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती, त्याला त्याच्या जागेसाठी संघर्ष करावा लागला आणि उपांत्य फेरीत ७० चेंडूत शतक झळकावणं हे अप्रतिम आहे. जेव्हा मॅक्सवेल आणि झम्पा अंतिम फेरीत गोलंदाजी करतात तेव्हा श्रेयस भारतासाठी महत्त्वाचे ठरेल.

श्रेयसने २०२२ मध्ये १५ इनिंग्जमध्ये ५५.७च्या सरासरीने ७२४ धावा केल्या, तर २०२३ मध्ये १७ इनिंग्जमध्ये ५६.४च्या सरासरीने ७९० धावा त्याच्या नावावर आहेत. यापैकी वर्ल्ड कपमध्ये १० इनिंग्जमध्ये ७५.१४च्या सरासरीने ५२६ धावा त्याने केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर त्याने ३२ इनिंग्जमध्ये ५३च्या सरासरीने १३९३ धावा केल्या असून एकूण कारकीर्दत त्याने ५२ इनिंग्जमध्ये ५०.६च्या सरासरीने २३२७ धावा केल्या आहेत.