मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने २९ धावांनी विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने ५ बाद २३४ धावा केल्या. यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाला ८ बाद २०५ धावा करता आल्या. विजयानंतर गुणतालिकेत फेरबदल झाले आहेत.
या पराभवानंतर दिल्ली संघाचे मोठे नुकसान झाले आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ आता गुणतालिकेत तळावर पोहोचला आहे. ५ सामन्यांमध्ये दिल्लीला फक्त एकच सामना जिंकता आला आहे आणि ते २ गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहेत.
या मोसमात मुंबई इंडियन्सने सलग तीन सामने गमावले होते. पण, आजच्या विजयासह त्यांनी गुणतालिकेत दोन स्थान वर झेप घेत ८वा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची नवव्या स्थानी घसरण झाली आहे.
राजस्थान रॉयल्स व कोलकाता नाईट रायडर्स हे यंदाच्या पर्वात अपराजित राहिले आहेत. चार विजयांसह RR अव्वल स्थानी आहे, तर KKR तीन विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत आणि त्यांनी ४ पैकी २ सामने जिंकले आहेत.
लखनौ सुपर जायंट्सने ३ पैकी २ सामने जिंकून चौथे स्थान पटकावले आहे. सनरायझर्स हैदराबाद २ विजयांसह पाचव्या, पंजब किंग्सही २ विजयांसह सहाव्या आणि गुजरात टायटन्स २ विजयांसह सातव्या क्रमांकावर आहे.