भारताच्या महान कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रृत्सिंतीग धोनीने काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. दरम्यान, त्याच्या निवृत्तीनंतर कोट्यवधी चाहते आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
दरम्यान, गोव्यातील धोनीच्या चाहत्यांनीही त्याने २०१० मध्ये एकदिवसीय सामन्यासाठी गोव्याला भेट दिली होती तेव्हाच्या आठवणी जागवल्या आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये २०१० मधील एकदिवसीय मालिकेचा तिसरा सामना गोव्यात नियोजित होता. गोव्यात ब-याच वर्षांनंतर हा सामना होत असल्याने गोमंतकीयांनाही या सामन्याची उत्सुकता लागली होती. त्यातच महेंद्रसिंग धोनी, युवराज, विराट कोहली हे नवखे चेहरे त्यावेळी चांगलेच फॉर्ममध्ये होते. त्यांचा प्रत्यक्ष खेळ पाहता येईल, याचीही उत्सुकता होती. मात्र ऑक्टोबर महिन्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हा सामना रद्द झाला होता. भारताने मालिका काबिज केली.
भारतीय टीम दक्षिण गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबली होती. पावसामुळे खेळ वाया गेल्यानंतर दिवसभर काय करायचे? या विचारात खेळाडू होते. काहींनी विश्रांती घेण्याचे ठरविले तर काही जण गोवा फिरण्याचा विचार करीत होते. अखेर धोनीसह काही क्रिकेटपटूंनी बिचकडे धाव घेतली.
धोनीने नुकतेच लग्न केले होते. त्यामुळे त्याची पत्नी साक्षीही त्याच्यासोबत होती.
धोनी-साक्षी बीचवर गेल्याचे कळताच सगळी टीम बीचवर आली. विराट, युवराज, रविंद्र जडेजा, आशिष नेहरा या खेळाडूंनी बीचवर मौजमजा केली.
धोनी आणि साक्षीने बोटींग केले. तसेच त्यांचे समुद्र किनाऱ्यावर मौजमजा करतानाचे क्षण क्षण उपस्थितांनी कॅमेराबद्ध केले.
साक्षीला गोवा खूप आवडतो, हे तो आजही सांगतो.