Join us  

दुसऱ्याचं सामन्यात त्रिशतक! 'या' सलामीवीरा इतक्या धावा ना सचिन करु शकला ना सेहवाग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 12:38 PM

Open in App
1 / 10

भारतीय क्रिकेटमधील दिग्गज शिलेदारांपैकी आज एका महत्वाच्या शिलेदाराचा वाढदिवस आहे. या खेळाडूनं आपल्या क्रिकेट करिअरच्या दुसऱ्याच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खणखणीत त्रिशतक ठोकलं होतं आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

2 / 10

रणजी क्रिकेटचा 'बॉस' अशी ओळख असलेल्या वसीम जाफरचा आज वाढदिवस. रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम वसीमच्या नावावर आहे. विशेष म्हणजे सचिन आणि सेहवागपेक्षाही अधिक धावा वसीम जाफरच्या नावावर आहेत.

3 / 10

१६ फेब्रुवारी १९७८ रोजी मुंबईत वसीम जाफर यांचा जन्म झाला होता. वसीम यांनी भारतीय संघाकडूनही कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळले आहेत. पण रणजी क्रिकेटमध्ये वसीमने आपली वेगळीच छाप सोडली आहे.

4 / 10

वसीम जाफरने आजवर स्थानिक क्रिकेटमध्ये अनेकदा संघाचं नेतृत्व देखील केलंय आणि संघाला विजेतेपद देखील मिळवून दिलं आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये तब्बल २० वर्ष वसीम जाफर यांनी सलामीवीर म्हणून फलंदाजी केली आहे.

5 / 10

रणजी करंडक जिंकणाऱ्या मुंबईच्या संघाचं त्यांनी ८ वेळा आणि विदर्भ संघाचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. जाफरने आपल्या कर्णधारपदाच्या काळात दोनवेळा मुंबईच्या संघाला रणजी करंडक जिंकून दिला आहे.

6 / 10

वसीम जाफरची रणजीतील आकडेवारीच सारंकाही सांगून जाते. रणजी स्पर्धेत १५६ सामन्यांमध्ये सर्वाधिक १२ हजार ०३८ धावा वसीमच्या नावावर आहेत. यात तब्बल ४० शतकं आणि सर्वाधिक २०० झेल टिपण्याचाही रेकॉर्ड वसीमच्या नावावर आहे.

7 / 10

वसीमच्या नावावर दुलीप करंडकमध्येही सर्वाधिक धावांची नोंद आहे. या स्पर्धेत सर्वाधिक २५४५ धावा केल्या आहेत. तर इराणी करंडक स्पर्धेतही १२९४ धावा केल्या आहेत.

8 / 10

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वसीम जाफर पाचव्या क्रमांकावर आहेत. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या पंक्तीत वसीम जाफर यांचा समावेश आहे.

9 / 10

क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर वसीम जाफर यांनी अनेक क्रिकेट संघांसाठी प्रशिक्षकाचंही काम पाहिलं. आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाचे ते फलंदाजी प्रशिक्षक आहेत. तर बांगलादेशच्या अंडर-१९ क्रिकेट संघाच्याही प्रशिक्षकपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. उत्तराखंड क्रिकेटच्या प्रशिक्षकपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण दुर्दैवाने काही वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

10 / 10

महत्वाची बाब अशी की वसीम जाफर यांचे जवळपास संपूर्ण कुटुंबच क्रिकेटशी संलग्न आहे. वसीम जाफर यांचे बंधू कलीम जाफर हे मुंबईमध्ये प्रशिक्षकाचं काम पाहतात. तर त्यांचा भाचा अरमान जाफर हा २०१६ सालच्या अंडर-१९ भारतीय क्रिकेट संघाकडून खेळला होता. तर त्यांची भाची फातिमा मुंबई आणि भारत अ संघाकडून खेळली आहे.

टॅग्स :वासिम जाफरभारतीय क्रिकेट संघरणजी करंडकबीसीसीआय