ऑस्ट्रेलियन संघानं रविवारी ट्वेंट-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियाचे हे सहावे जागतिक जेतेपद ठरले. त्यांनी पाच वेळा ( 1987, 1999, 2003, 2007, 2015) वन डे वर्ल्ड कप जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर मिचेल स्टार्क व अॅलिसा हिली (Mitchell Starc and Alyssa Healy) या कपलनं वेगळाच विक्रम नावावर केला.
न्यूझीलंडच्या ४ बाद १७२ धावांचा ऑस्ट्रेलियानं १८.५ षटकांत दोन फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पाठलाग केला. किवी कर्णधार केन विलियम्सननं ४८ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८५ धावा केल्या. हेझलवूनंच त्याची विकेट घेतली. हेझलवूडनं ४ षटकांत १६ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श ही जोडी तुफान खेळली. वॉर्नर ३८ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावांवर माघारी परतला. मार्श ५० चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावांवर नाबाद राहिला. मॅक्सवेलनं नाबाद २८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं १८.५ षटकांत ८ विकेट्स राखून विजय मिळवला.
या विजेतेपदासह ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट विश्वातील जोडीच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला गेला. मिचेल स्टार्क आणि त्याची पत्नी अॅलिसा हीली (Mitchell Starc and Alyssa Healy) या दोघांची जेतेपदानंतर जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. हे कपल आता क्रिकेट विश्वातील पॉवर फूल कपल ठरले आहे.
अॅलिसा ही ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची यष्टिरक्षक-फलंदाज आहे. तिनं ऑस्ट्रेलियासाठी ५ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकले आहेत. २०१८च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ती सर्वोत्तम खेळाडू ठरली होती. अॅलिसा ही ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक इयान हिलीची भाची आहे. अॅलिसानं २०२०च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध ३९ चेंडूत ७५ धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाच्या जेतेपदानंतर मिचेल स्टार्क आणि अॅलिसा हिली हे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणारे पहिले कपल ठरले आहेत.