स्कूटरची सवारी... मनीष पांडेनंतर भारताच्या आणखी एका क्रिकेटपटूचा विवाह

भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडेनं मागील आठवड्यात प्रेयसी अश्रिता शेट्टी हिच्यीशी विवाह केला. त्यानंतर भारताचा आणखी एक खेळाडू विवाहबंधनात अडकला आहे.

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या इंडियन प्रीमिअर लीगमधील संघांचा माजी खेळाडू कृष्णप्पा गोवथमनं शुक्रवारी विवाह केला. कर्नाटक क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडूनं प्रेयसी अर्चना सुंदर हिच्याशी विवाह केला.

सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत त्यानं सात सामन्यांत 4 विकेट्स आणि 67 धावा केल्या होत्या. पण, कर्नाटक प्रीमिअर लीगमधील कामगिरीमुळे तो चर्चेत आला होता. त्यानं शतकी खेळी केलीच शिवाय 15 धावांत 8 विकेट्स घेत इतिहास घडवला.

बेल्लारी टस्कर्स विरुद्ध शिवामोग्गा लायन्स यांच्यातील सामन्यात टस्कर्स संघाचे प्रतिनिधित्व करताा 56 चेंडूंत नाबाद 134 धावा केल्या आणि त्याच सामन्यात त्यानं 8 विकेट्सही घेतल्या. पण, कर्नाटक प्रीमिअर लीगमधील सामने अधिकृत ट्वेंटी-20 सामने नसल्यानं त्याच्या या विक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून झाली नाही.

इंडियन प्रीमिअर लीगच्या ट्रेंड विंडोत राजस्थान रॉयल्स संघानं त्याला पुढील मोसमासाठी किंग्स इलेव्हन पंजाबकडे दिले आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कृष्णप्पानं 36 सामन्यांत 761 धावा केल्या. त्यात 149 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. शिवाय त्यानं 132 विकेट्सही घेतल्या आहेत.

लिस्ट ए आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमधील त्याची कामगिरी कमाल आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये 45 सामन्यांत त्यानं 530 धावा आणि 67 विकेट्स घेतल्या आहेत, तर ट्वेंटी-20त 56 सामन्यांत 521 धावा आणि 36 विकेट्स घेतल्या आहेत.