"मोठं नाव, खूप फॅन्स आहेत म्हणून..."; रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांदरम्यान क्रिकेटरचं विधान

Rohit Sharma Retirement, Mumbai Indians IPL 2025: "वैयक्तिक स्वार्थासाठीही खेळत राहू नये, स्वत:च्या मनाला विचारावं"

टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्मा गेल्या अनेक महिन्यांपासून फॉर्मशी झगडताना दिसतोय. ऑस्ट्रेलिया दौरा आणि चॅम्पियन्स ट्रॉफी दोन्ही त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

रोहितने IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्सकडून यंदाच्या हंगामात ४ सामने खेळले. त्यातही हिटमॅन पूर्णपणे अपयशी ठरला. रोहितला केवळ ०, ८, १३ आणि १७ धावांच्या खेळी करता आल्या, ज्याचा संघालाही फटका बसला.

रोहित शर्माच्या विचित्र फॉर्ममुळे त्याने निवृत्त व्हावे असा एक सूर भारतीय चाहत्यांकडून ऐकायला मिळाला. पण रोहित मात्र इतक्यात निवृत्त होणार नसल्याचे स्पष्टपणे म्हणालाय. त्यातच इंग्लंडचा माजी क्रिकेटर मोईन अलीने रोखठोक मत मांडलंय.

क्रिकेटपटूने केव्हा निवृत्त व्हावे यावर त्याने भाष्य केले आहे. तो म्हणतो, "केवळ तुम्ही खूप बडे खेळाडू आहात किंवा तुमचं नाव खूप मोठं आहे किंवा तुमचे फॅन्स खूप जास्त आहेत म्हणून खेळत राहण्यात काहीच अर्थ नाही."

"स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठीही खेळत राहू नये. स्वार्थीपणा करून क्रिकेट खेळत राहणे अयोग्य आहे. त्यापेक्षा खेळण्याबाबतचे सत्य काय आहे ते मनाला विचारावे आणि मग योग्य वाटेल तसा निर्णय घेऊन टाकावा."

"संघाने तुम्हाला काही वेगळे प्लॅन्स सांगितले तर तुम्ही त्यानुसार वागायला हवे. जर तुमची खेळी चांगली होत नसेल आणि वय झालंय असं वाटत असेल तर स्वत:हून बाजूला यावं आणि नव्या पिढीच्या खेळाडूंना संधी द्यावी."

"नवे लोक तुमच्यापेक्षा भारी असतील असं नाही. पण कदाचित त्यांचा खेळ तुमच्यापेक्षा चांगला असू शकतो. अशा वेळी तुम्ही सत्य काय आहे त्याकडे डोळे उघडून पाहाला हवे. संघात उगाच जागा अडवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही."