सनरायझर्स हैदराबादच्या संघाने घरच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाला रोखत ५७ धावांनी दमदार विजय नोंदवला.
ईशान किशनच्या नेतृत्वाखालील SRH संघाला आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील दुसरा विजय मिळवून देण्यात पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या प्रफुल हिंगे आणि साकिब हूसेन या जोडीनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दोघांनीही प्रत्येकी ४-४ विकेट्सचा डाव साधला.
आयपीएलमध्ये एकाच संघाकडून पदार्पणात भेदक माऱ्यासह संघाला एकतर्फी सामना जिंकून देणारी ही पहिली जोडी ठरली. पहिल्या तीन षटकात या दोघांनी अवघ्या ९ धावांवर राजस्थान रॉयल्सचा अर्धा संघ तंबूत धाडला. हा देखील एक विक्रमच आहे.
इथं एक नजर टाकुयात IPL च्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात ४ विकेट्सचा डाव साधणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या खास विक्रमावर...
२०२६ च्या हंगामात जलदगती गोलंदाज प्रफुल हिंगे याने सनरायझर्स हैदराबादकडून स्वप्नवत पदार्पण करताना २ षटकातच ४ विकेट्सचा डाव साधला. राजस्थानविरुद्ध चार षटकात त्याने २९ धावा खर्च केल्या.
प्रफुल हिंगेसोबत सनरायझर्स हैदराबादकडून राजस्थान रॉयल्स विरुद्ध पदार्पणाची संधी मिळालेल्या साकिब हूसेन याने २४ धावा खर्च करून ४ विकेट्स आपल्या खात्यात जमा करत सर्वांचे लक्षवेधून घेतले.
२०२५ च्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाच्या सामन्यात अश्वनी कुमार याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध २४ धावा खर्च करत ४ विकेट्सचा डाव साधला होता.
२०११ च्या हंगामात पंजाब किंग्सच्या संघाकडून पदार्पण करताना मध्यम जलदगती गोलंदाज पॉल चंद्रशेखर वल्थाटी याने डेक्कन चार्जेस विरुद्धच्या सामन्यात २९ धावा खर्च करून ४ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.
२००९ च्या हंगामात भारताचा माजी डावखुरा ऑर्थोडॉक्स गोलंदाज शादाब जकाती याने चेन्नई सुपर किंग्सच्या संघाकडून पदार्पणाचा सामना खेळताना जोहन्सबर्गच्या मैदानात डेक्कन चार्जर्स संघाविरुद्ध २४ धावा खर्च करून ४ विकेट्स घेतल्या होत्या.