Join us

आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 13:21 IST

Open in App
1 / 6

आयपीएलमध्ये सोमवारी रात्री राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेला सामना हा सर्वार्थाने ऐतिहासिक ठरला. या सामन्यात स्पर्धेतील अनेक विक्रम मोडले गेले तर काही नवे विक्रमही रचले गेले. या सर्वांमध्ये तुफानी शतकी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशी या अवघ्या १४ वर्षांच्या मुलाने आपल्या विस्फोटक खेळीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

2 / 6

आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा फलंदाज ठरलेल्या वैभव सूर्यवंशीने सुरुवातीच्या सामन्यांमध्येच आपल्यामधील प्रतिभेची चुणूक दाखवली होती. वैभव सूर्यवंशीने आयपीएलमधील पदार्पणातील सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता. तर काल रात्री त्याने अवघ्या ३५ चेंडूत शतकी खेळी करत क्रिकेट जगतात एका नव्या विस्फोटक फलंदाजाचा उदय झाल्याचे संकेत दिले आहेत. आता या युवा खेळाडूबाबत जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

3 / 6

त्यात वैभव सूर्यवंशी कधीपासून क्रिकेट खेळतोय? तो कितवीत आहे आणि तो कुठल्या शाळेत जातो, याबाबत जाणून घेण्यासही अनेकजण उत्सुक आहेत. याबाबत वैभव सूर्यवंशीचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी एका मुलाखतीमधून माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, वैभवने वयाच्या पाचव्या वर्षापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. लहान वयातच चांगलं क्रिकेट खेळू लागल्याने त्याला आम्ही समस्तीपूरमधील पटेल मैदान येथे असलेल्या ब्रिजेश झा यांच्या शिबिरात पाठवलं. तेव्हा त्याचं वय केवळ ७ वर्षे एवढं होतं.

4 / 6

वैभव कितवीत आहे आणि तो कुठल्या शाळेत शिकतो, याबाबत विचारलं असता त्याच्या वडिलांनी सांगितलं की, वैभव बिहारमधील डॉ. मुक्तेश्वर सिन्हा मॉडेस्टी स्कूल, ताजपूर या शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकतो. तो सकाळी उठून क्लासलाही जातो. मात्र त्याने आपलं सर्व लक्ष हे क्रिकेटवरच केंद्रीत केलं आहे. क्रिकेट आणि अभ्यास अशा दोन्हींमध्ये संतुलन साधणं कठीण आहे. त्यामुळे आम्हीही त्याच्यावर अभ्यासासाठी फारसा दबाव आणत नाही.

5 / 6

याआधी देशांतर्गत क्रिकेटमध्येही वैभवने आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवून दिली आहे. रणजी, विजय हजारे करंडक आणि सय्यद मुश्ताक अली करंडक अशा स्पर्धांमध्येही त्याने चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं आहे. वैभव सूर्यवंशी सचिन तेंडुलकर आणि महेंद्र सिंह धोनी यांना आपलं आदर्श मानतो. तसेच त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करायचं आहे.

6 / 6

वैभवने आपल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर क्रिकेट जगताचं अल्पावधीतच लक्ष वेधून घेतलं होतं. तसेच आयपीएल २०२५ साठी झालेल्या लिलावामध्ये त्याला राजस्थान रॉयल्सने तब्बल १.१० कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केलं होतं.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५राजस्थान रॉयल्सटी-20 क्रिकेट